इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल

जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. 

Updated: Mar 22, 2020, 10:43 AM IST
इटलीमध्ये अडकलेल्या 263 भारतीयांना घेऊन विशेष विमान दिल्लीत दाखल title=

नवी दिल्ली : आज जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. अनेक जण वेगवेगळ्या देशांमध्ये फसले आहेत. त्यातच इटलीमध्ये फसलेल्या 263 भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विमानाने सुरक्षित भारतात आणलं आहे. यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव हा इटलीवर होत आहे. इटलीमध्ये एकाच दिवसात 793 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात 12 हजाराहून अधिक लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. तर जवळपास अडीच लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

इटलीमध्ये कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी कोरोनामुळे इटलीमध्ये 627 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 5986 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 4032 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 47 हजाराहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.

भारताने कोरोनाचं वाढतं संक्रमण पाहता विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेक देशांमधून भारतात येण्यासाठी विमान उपलब्ध नाही आहेत. पण भारत सरकार इतर देशांमध्ये फसलेल्या लोकांना भारतात आणण्याचं काम करत आहे. आतापर्यंत इटली आणि इराण मधून 400 हून अधिक लोकांना विशेष विमानाने भारतात आणलं गेलं आहे. 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत इराणमधून 234 जणांना भारतात आणलं गेलं आहे. ज्यामध्ये 131 विद्यार्थी तर 103 प्रवाशी होते.

'मिशन एयरलिफ्ट' पूर्ण झाल्यानंतर एस जयशंकर यांनी ट्विट करत इराणचे राजदूत  धामू गद्दाम आणि संपूर्ण टीमचे आभार मानले.