"आई, बाबा मला माफ करा, पण माझ्याकडे पर्याय नाही," 22 वर्षाच्या मुलाची चिठ्ठी पाहून पालक हादरले, नंतर कळलं...

बंगळुरुत 22 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाने चिनी अ‍ॅपकडून कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करत नसल्याने या अ‍ॅपचे एजंट त्याला त्रास देत होते. यातूनच त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.   

शिवराज यादव | Updated: Jul 13, 2023, 12:51 PM IST
"आई, बाबा मला माफ करा, पण माझ्याकडे पर्याय नाही," 22 वर्षाच्या मुलाची चिठ्ठी पाहून पालक हादरले, नंतर कळलं... title=

मुलं मोठी झाल्यानंतर अनेक निर्णय घेऊ लागतात ज्याच्या त्यांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होत असतो. अनेकदा हे निर्णय आपल्या आई-वडिलांचा सल्ला न घेता, त्यांच्या नकळत घेतलेले असतात. त्यामुळे यातील धोक्यांची त्यांना जाणीव नसते. जेव्हा ती जाणीव होते, तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. दुसरीकडे अनेक पालकांनाही आपली मुलं नेमकी कशात गुंतलेली आहेत याची कल्पनाच नसते. अशीच काहीशी घटना बंगळुरुत समोर आली आहे, जिथे एका 22 वर्षांच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 

बंगळुरुत मंगळवारी 22 वर्षाच्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. तरुणाने एका चिनी अ‍ॅपकडून कर्ज घेतलं होतं. पण या कर्जाची परतफेड करणं त्याला शक्य होत नव्हतं. यामुळे अ‍ॅपचे एजंट त्याला त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. 

तेजस असं या तरुणाचं नाव आहे. त्याने बंगळुरुतील आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. येलाहंका येथील निट्टे मिनाक्षी कॉलेजात तो इंजिनिअरिंग शिकत होता. तरुण कर्जाची परतफेड करत नसल्याने एजंट त्याला ब्लॅकमेल करत धमकावत होते. जर पैसे परत केले नाहीत, तर तुझ्या मोबाइलमधील आक्षेपार्ह फोटो जाहीर करु अशी धमकी या एजंट्सनी तेजसला दिली होती.

तेजसच्या कुटुंबाने यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तेजसने चिनी मोबाइल अ‍ॅप 'Slice and Kiss' कडून कर्ज घेतलं होतं. पण हे पैसे परत करण्यात तो असमर्थ ठरत होता. 

तेजसचे वडील गोपीनाथ यांना फार उशिरा मुलाने कर्ज घेतल्याची माहिती मिळाली. जेव्हा त्यांना संपूर्ण घटनेची माहिती मिळाली होती, तेव्हा त्यांनी हफ्ते भरत सगळं कर्ज फेडू असं आश्वासन दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. 

मोबाईल अ‍ॅपचे एजंट तेजसच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी त्याला धमकावलं, तसंच नंतर धमकीचे फोनही केले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तेजसच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी गोपीनाथ यांनी कर्ज फेडण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली होती. पण एजंट काही ऐकण्यास तयार नव्हते. 

मंगळवारी संध्याकाळी एजंट्सनी पुन्हा एकदा तेजसला फोन केले होते. या फोन कॉल्सनंतर तेजसने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आणि राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी तेजसने चिठ्ठी लिहून आई-वडिलांची माफी मागितली. "आई आणि बाबा मी जे काही केलं, त्यासाठी मला माफ करा. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. माझ्या नावे असणारी इतर कर्जं मी फेडू शकण्यात असमर्थ आहे. हा माझा अंतिम निर्णय आहे. गुडबाय," असं तेजसने चिठ्ठीत लिहिलं होतं.