१५ वर्षांच्या मुलाने ४५ लाखांचे हिरे केले परत

एका गरिब घरातील १५ वर्षीय मुलाने तब्बल ४५ लाखांचे हिरे परत केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हा लहान मुलगा संपूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 20, 2017, 04:22 PM IST
१५ वर्षांच्या मुलाने ४५ लाखांचे हिरे केले परत title=
Representative Image

सूरत : एका गरिब घरातील १५ वर्षीय मुलाने तब्बल ४५ लाखांचे हिरे परत केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हा लहान मुलगा संपूर्ण गुजरातमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं पहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हि-यांचे व्यापारी असलेले मनसुखभाई सवालिया यांच्या खिशातून हि-यांचं पॅकेट खाली पडलं. मात्र, आपल्या खिशातून हि-यांचं पॅकेट पडल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्याच ठिकाणी १५ वर्षांचा विशाल क्रिकेट खेळत होता आणि त्याला ते पॅकेट सापडलं. 

विशालने ते पॅकेट घरी आणले आणि वडील फुलचंद यांच्याकडे दिले. फुलचंद यांनी ते हि-यांचं पॅकेट सूरत हिरा संघाला परत केले. विशालचे वडील फुलचंद हे वॉचमन आहेत. 

वडील आणि मुलाचा प्रामाणिकपणा पाहून सूरत डायमंड असोसिएशनने त्या दोघांचाही सत्कार केला. असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश नवादिया यांनी सांगितलं की, विशालच्या एक वर्षाचा शैक्षणिक खर्चही असोसिएशनकडून केला जाणार आहे.