पाटणा: बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये श्रावणी सोमावर निमित्त बाबा गरीबनाथाच्या चरणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झालीय. शहरातल्या ओरिएंटल क्लबजवळ पोलीसांचं नियंत्रण सुटल्यानं भाविक एकमेकांवर आदळू लागले. या चेंगराचेंगरीत १५ भाविक जखमी जाल्याचे वृत्त आहे.
श्रावण मास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना, सुंदर हिरवागार परिसर आणि धार्मिक पूजा पाठाचा उत्सव, या महिन्यात महादेवाचे भक्त महादेवाला उपास वारी करत भजत असतात. आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे.
पहिला श्रावणी सोमवार असल्याने राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. त्र्यंबकेश्वरसह घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, भिमाशंकर इथं भाविकांची रीघ लागलीय. हर..हर..महादेवचा गजर करत भाविक दर्शन घेताहेत. या मंदिरांमध्ये विशेष पुजेसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्याच्या इतरही भागातील प्रसिद्ध महादेव मंदिरात पूजा-अभिषेक करण्यासाठी महिला वर्गासह भाविकांची लगबग दिसतेय.