पटना : बिहारमध्ये मेंदूज्वराचं थैमान सुरूच आहे. मृतांचा आकडा १२७ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज मुजफ्फरपूरचा दौरा करत आहेत. सरकारी यंत्रणा आणि डॉक्टरांमध्ये या मृत्यूंबाबत दुमत आहे. अॅक्युट एन्सेफलायटीस सिन्ड्रोममुळे बहुतांश मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर सरकारी विभाग मात्र हायपोग्लिसेमियामुळे मृत्यू झाल्याचं म्हणतो आहे. केंद्रीय आरोग्य खात्यानंही या प्रकऱणाची गंभीर दखल घेतली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्रीय आरोग्य खातं आणि बिहार सरकार या दोघांनाही नोटीसा पाठवल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले मृत्यू हे सरकारी विभागांची निष्काळजी अधोरेखित करतात असं विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री आज डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. एसकेएमसीएचमध्ये ८८ तर केजरीवाल रुग्णालयात १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर १०० मुलांवर उपचार सुरु आहे.