मुंबई : कोरोनाचा धोका टळलेला नाही. कोरोनाच्या विविध लाटा अनेक देशांमध्ये चालू आहेत. म्हणून सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे. दरम्यान, पोस्ट कोविड लक्षणांवरील संशोधनातून एक आश्चर्यकारक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार कोविडवर मात केल्यानंतर बरं झालेल्यांना अजून एक समस्या भेडसावतेय या व्यक्तींना विचार करण्यात आणि एकाग्र होण्यात अडचणी येत आहेत. इतकंच नाही तर स्मरणशक्ती कमी होण्याची लक्षणंही अनेक लोकांमध्ये दिसून आली.
कोरोनावर मात केल्यानंतर त्यातून बरं झाल्यावर लोकांना विचार करण्यात आणि एकाग्रता यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतंय. मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनाच्या अहवालात असं म्हटलं आहे की, कोरोनाच्या गंभीर लक्षणांमुळे प्रभावित झालेले लोक ऑनलाइन परीक्षांमध्ये कमी गुण मिळवू शकतात. याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो.
EClinicalMedicine प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, ज्या लोकांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं त्यांच्यामध्ये गोष्टी ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचं दिसून आलं.
संशोधन करणाऱ्या लेखकाच्या मते, 'अभ्यासात अनेक पैलू तपासण्यात आले. या दरम्यान असे आढळून आले की कोरोनामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होत आहे. विविध पैलू पाहता, असं लक्षात आलं की, मेंदूवर कोविडचे काही महत्त्वपूर्ण परिणाम होतात आणि ज्यासाठी अजून संशोधनाची आवश्यकता आहे.
कोरोनातून मुक्त झाल्यानंतर अनेकांना त्यानंतर येणाऱ्या समस्यांनाही तोंड द्यावं लागतंय. संशोधन दर्शवते की, कमीतकमी 5 ते 24% लोकांमध्ये तीन ते चार महिन्यांसाठी कोरोनाची लक्षणं दिसून असतात. दीर्घकालीन कोविडचा धोका यापुढे थेट वयाशी किंवा कोविडच्या सुरुवातीच्या तीव्रतेशी संबंधित असल्याचं मानलं जात नाही.