कोरोना आणि मंकीपॉक्ससारख्या अजून महामारी येणार? WHO कडून चिंता व्यक्त

भविष्यात जगाला मंकीपॉक्स, इबोला आणि कोरोना सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं

Updated: Jul 15, 2022, 06:28 AM IST
कोरोना आणि मंकीपॉक्ससारख्या अजून महामारी येणार? WHO कडून चिंता व्यक्त title=

मुंबई : भविष्यात कोरोना आणि मंकीपॉक्स सारख्या इतर साथीच्या महामारीप्रमाणे अजून महामारी लोकांसमोर येऊ शकतात असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलं आहे. गेल्या दशकात आफ्रिकेतील प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरलेल्या रोगांची संख्या 60% पेक्षा जास्त वाढली आहे. अशा परिस्थितीत भविष्यात जगाला मंकीपॉक्स, इबोला आणि कोरोना सारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने गुरुवारी एका निवेदनात म्हटलंय की, 2012 ते 2022 पर्यंत प्राण्यांच्या रोगांच्या संख्येत 63 टक्के वाढ झाली आहे. WHO ने घोषित केलंय की, मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी घोषित करावं की नाही याचं मूल्यांकन करण्यासाठी ते पुढील आठवड्यात आपत्कालीन बैठक आयोजित करेल.

"जुनोटिक संसर्गाला रोखण्यासाठी काम केलं पाहिजे जेणेकरुन ते मोठ्या प्रमाणातील संसर्गास कारणीभूत ठरणार नाहीत." असे WHO चे आफ्रिकेचे संचालक डॉ मतशिदिसो मोएती यांनी म्हटलंय.

ते म्हणाले की, आफ्रिकेतील प्राण्यांच्या रोगांमुळे शतकानुशतकं लोकांना संसर्ग होतोय, परंतु त्यांचा संपूर्ण खंडात वेगाने प्रसार झाल्याने चिंता वाढली आहे. 

तज्ज्ञांना अशीही भीती वाटतेय की, एकेकाळी दुर्गम ग्रामीण भागात मर्यादित असलेला उद्रेक आता आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे आफ्रिकेतील मोठ्या शहरांमध्ये अधिक वेगाने पसरू शकतो, ज्यामुळे जगभरातील रोगांचा प्रसार होऊ शकतो.