मुंबई : देशभरात नव्या वर्षापासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान सध्या लहान मुलांना Covaxin ही लस देण्यात येणार आहे. तर यावर भारत बायोटेक कंपनीने मोठा दावा केला आहे. भारत बायोटेक कंपनीने ही लस लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
भारत बायोटेकने गुरुवारी सांगितलं की, त्यांची कोरोना लस BBV152 कोव्हॅक्सिनच्या चाचणीत 2-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आणि इम्युनोजेनिक आहे. या लसीच्या अभ्यासाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात या गोष्टी समोर आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
भारत बायोटेकने सांगितलं की, कंपनीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनेक केंद्रांवर ओपन-लेबल चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये, 2-18 वयोगटातील निरोगी मुलांवर कोवॅक्सीनची सुरक्षितता, प्रतिसाद आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी चाचणी घेण्यात आली.
भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एला म्हणाले, "लहान मुलांमध्ये कोवॅक्सिन चाचण्यांचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. त्यामुळे आम्हाला कळवण्यास आनंद होतोय की, Covaxin ही मुलांसाठी सुरक्षित आणि इम्युनोसप्रेसिव्ह असल्याचं सिद्ध झालं आहे. आम्ही प्रौढ आणि मुलांसाठी सुरक्षित तसंच प्रभावी लस विकसित करण्याचं आमचं ध्येय साध्य केलं आहे."
भारत बायोटेकच्या मते, या अभ्यासात मुलांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नाहीत. 374 मुलांमध्ये सौम्य किंवा गंभीर लक्षणं आढळून आली. यापैकी 78.6% एका दिवसात बरे झाल्याची नोंद आहे.