Zika Virus: पुण्यात झिका व्हायरसने थैमान घातल्याचं दिसून येतंय. पुणे महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात वेगवेगळ्या भागांमधून झिका व्हायरसचे रुग्ण सापडतायत. आतापर्यंत झिका व्हायरसचे 11 रुग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मुंढवा, पाषाण आणि आंबेगाव बुद्रुक या परिसरात राहणाऱ्या गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा धोका अधिक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना झिका व्हायरसचा कितपत धोका आहे याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. जाणून घेऊया यावेळी तज्ज्ञ काय म्हणाले आहेत?
मुंबईच्या एका रूग्णालयातील वरिष्ठ सल्लागार-इंटर्नल मेडिसिन डॉ. परितोष बघेल यांच्या माहितीनुसार, झिका हा एक विषाणू आहे जो गर्भवती महिलांवर गंभीरपणे परिणाम करू शकतो. जर तुम्हाला गरोदरपणात झिका विषाणूची लागण झाली असेल तर बाळाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणेदरम्यान झिका संसर्गामुळे जन्मजात दोष होऊ शकतात जसे की मायक्रोसेफली, डोळ्यांच्या समस्या, श्रवण कमी होणं आणि इतर न्यूरोलॉजिकल समस्या.
डॉ. पारितोष पुढे म्हणाले की, यावेळी कोणतीही लस उपलब्ध नाही. संसर्ग टाळण उपयुक्त ठरणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक नसल्यास झिका बाधित भागात प्रवास करणे टाळा. डास चावणार नाही याची दक्षता घेता पूर्ण बाह्याचे कपडे घाला. झिका विषाणूची लागण झालेल्या किंवा अलीकडे झिका बाधित भागात प्रवास केलेल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध टाळा.
मुंबईतील डॉ. अजय शाह म्हणाले की, मुले आणि गर्भवती महिलांना झिका विषाणूचा धोका जास्त असतो. गर्भवती महिलांना सर्वात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेदरम्यान झिका संसर्गामुळे गंभीर जन्म दोष होऊ शकतो, जसे की मायक्रोसेफली, ज्यामुळे मुलांचे डोके आणि मेंदू असाधारणपणे लहान होतो. मुलांमध्येताप, पुरळ आणि सांधेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांवर आणि एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जोखीम कमी करण्यासाठी, गर्भवती महिला आणि मुलांनी झिका विषाणूचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जाणं टाळावे. अशा ठिकाणी प्रवास करणे आवश्यक असल्यास, त्यांनी कडक सावधगिरी बाळगली पाहिजे. घरी मच्छर प्रतिबंधक वापरा, लांब बाह्याचे कपडे आणि पँट घाला. याव्यतिरिक्त, मच्छरदाणी वापरणे आणि डासांची पैदास करणारे उभे पाणी काढून टाकणे झिका संसर्गाचा धोका आणखी कमी करू शकते, असंही डॉ. अजय शाह यांनी सांगितलंय.