लंडन : सध्या क्रेझ आहे ती स्मार्टफोनची. स्मार्टफोन आता अनेकांची गरज बनली आहे. जीवनाचा एक अविभाज्य अंग बनला आहे. एक दिवसही स्मार्टफोनशिवाय घालवणे अनेकांना कठीण वाटते ! मात्र हाच स्मार्टफोन तुमच्यासाठी खून हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्याला तुमच्यापासून जितका वेळ दूर ठेवता येईल, तेवढा ठेवा. तरच तुम्ही दीर्घायुष्य आणि आरोग्यमय जीवन जगू शकाल. अन्यथा तुमचे आरोग्य धोक्यात आले म्हणून समजा. तुम्ही स्मार्टफोनला स्वत:पासून दूर ठेवले नाहीतर तुम्ही खूप काही गमावून बसाल, असे संशोधकांनी म्हटले आहे.
स्मार्टफोन फोनच्या वापराचा आपल्या शरीरावरील मोठा परिणाम होत आहे. याचा थेट संबंध येतो तो मेंदूशी. स्मार्टफोन पाहत असताना नेहमीच डोपामाईनचे नाव समोर येते. हे मेंदूतील एक रसायन आहे, जे आपल्या सवयी निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, आपल्याला एखाद्या गोष्टीची चटक लागण्यासाठी ते जबाबदार असते. हेच लक्षात घेऊन स्मार्टफोन आणि अॅप्सला अशाप्रकारे बनवले गेले आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या सातत्याने संपर्कात राहिल्यावर डोपामाईनचा स्त्राव वाढतो. हाच मोठा तुम्हाला धोका आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
स्मार्टफोनची माणसाला त्याची इतकी सवय होते की त्याशिवाय राहणे कठीण वाटते. अनेकांना रात्री-अपरात्रीही मोबाईल घेऊन बसण्याची सवय जडते, ती यामुळेच. स्मार्टफोनच्या अतिवापराने कार्टिसोलचाही स्तर वाढतो, असे दिसून आले आहे. हे एक स्ट्रेस हार्मोन असून ते ताणतणावासाठी जबाबदार असते. त्याच्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब किंवा रक्तातील साखरेचा स्तर वाढणे अशा गोष्टी घडतात.
स्मार्टफोनमुळे कार्टिसोलचा स्तर वाढणे, ही बाब चिंताजनक आहे. हा वाढलेला स्तर मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला प्रभावित करीत असतो. मेंदूचा हाच भाग निर्णय घेण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी मदत करीत असतो. मात्र, काळांतराने याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनचे डेव्हीड ग्रीनफिल्ड यांनी सांगितले. त्यामुळे किती स्मार्टफोन वापरायचा याचा विचार करा.