शहनाझ हुसेनच्या खास ब्युटी टीप्स

श्रावण महिना सुरू झाला की सणा-वरांची रेलचेल सुरू होते. 

Updated: Aug 19, 2018, 08:26 AM IST
शहनाझ हुसेनच्या खास ब्युटी टीप्स  title=

मुंबई : श्रावण महिना सुरू झाला की सणा-वरांची रेलचेल सुरू होते. सत्यनारायणाची पूजा, मंगळागौरपासून येत्या काही दिवसात रक्षाबंधनाचा सण येईल. पावसाळ्याच्या दिवसात हवामानात बदल झाल्यानंतर तुमच्या आहरात बदल करणंही गरजेचे आहे. आरोग्याप्रमाणेच तुमचं सौंदर्यही जपायचं असेल तर ब्युटी एक्सपर्ट शह्नाझ हुसेन यांच्या या खास टीप्स नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील. 

कलिंगडाचा रस - 

त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी कलिंगडाचा रस फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला तजेला देण्यास, शुष्कता कमी होण्यास मदत होते. कलिंगडामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. आहारात कलिंगडाचा समावेश करण्यासोबतच चेहर्‍यावर किमान 20 मिनिटं कलिंगडाचा रस लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. 

फ्रुट मास्क -

केळं, सफरचंद, पपई, संत्र या फळांचा त्वचेचा पोत सुधारण्यास फयादा होतो. किमान अर्धा तास चेहर्‍यावर या फळांचा मास्क लावा. यामुळे त्वचेतील दाह कमी होण्यास मदत होते. मृत त्वचेचा थर कमी करण्यास तसेच चेहर्‍यावरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते. 

कुलिंग मास्क - 

काकडी ही थंड प्रवृत्तीची असल्याने त्वचेतील दाह कमी करण्यास ती फायदेशीर आहे. काकडीच्या गरामध्ये दोन चमचे दूध पावडर, अंड्याचा पांढरा भाग मिसळून लावा. या पेस्टचा चेहर्‍यावर, मानेवर हलका थर पसरवा. सुमारे अर्धा तासाने मास्क सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. 

गुलाबपाणी - 

डोळ्यांवरील थकवा, डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी गुलाबपाण्यात भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा. यासोबतच टी बॅग्स देखील फायदेशीर ठरतील. आयपॅडसाठी भिजवलेले ग्रीन टीच्या बॅग़्स भिजवून, त्यातील थोडं पाणी काढून डोळ्यांवर ठेवा.