मुंबई: हौसेखातर किंवा गरज म्हणून म्हणा. आपल्यापैकी अनेक लोक पँटच्या मागच्या खिशात पैशांचे पाकीट ठेवतात. त्यात आणखी महत्त्वाचे असे की, पाकीटात पैसे असो नसो. पाकीट मात्र नेहमीच असते जाडजूड. खिसा फुगवणारे. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमची पाकीट ठेवण्याची हिच सवय तुम्हाला अत्यंत घातक ठरू शकते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही सवय तुमच्या शरीराला गंभीर इजा पोहोचवू शकते.
डॉ. राममनोहर लोहिया चिकित्सालयातील न्यूरो सर्जन विभागाचे प्रमुख डॉ. फरहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सवईमुळे शरीरातील स्नायू, कंबर आणि पाठीच्या कण्याच्या हाडाला इजा पोहोचू शकते. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित न्यूरो ट्रॉमा या विषयावरील कार्यशाळेत डॉ. फरहान बोलत होते. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत देश-विदेशातील सुमारे ३६० न्यूरो सर्जन सहभागी झाले होते.
डॉ. फरहान यांनी सांगितले की, आपले पाकीट पँटमध्ये ज्या बाजूला असते त्या बाजूचे स्नायू दबले जातात. तसेच, पाकीट असल्यामुळे लोकांना बसताना तोल सावरता येत नाही. ते काहीसे एका बाजूला झुकून किंवा तिरके बसलेले असतात. असा वेळी मणक्याचे, कंबरेचे हाड तिरखे होण्याचा धोका वाढतो. अनेकदा तुमच्या खुबा, कंबर किंवा पाठदुखीचे कारण हे पँटमधील पाकीटही असू शकते. तुम्हाला जर अशा प्रकारचा त्रास जाणवत असेल तर, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लगेच सीटी स्कॅन करून घ्या. किरकोळ दुखण्याकडे केले जाणारे दुर्लक्ष हे महागात पडू शकते, असा इशाराही डॉ. फरहान यांनी या वेळी दिला
कंबर, पाठीचा मनका त्यातील स्नायू आणि हाडांवर सतत ताण आल्याने डोके आणि पाठीच्या हाडांमध्ये एक सूक्ष्म दरी निर्माण होते. एकदा का ही दरी निर्माण झाली की, ती कमी करणे प्रचंड कठीण होऊन बसते.