तुम्हीदेखील शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाता? मात्र, असं करणं ठरु शकतं आरोग्यासाठी घातक

अनेकदा लोक भात पुन्हा गरम करुन खातात आणि यामुळे शरीरावर याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरते. 

Updated: Jan 29, 2025, 04:03 PM IST
तुम्हीदेखील शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाता? मात्र, असं करणं ठरु शकतं आरोग्यासाठी घातक title=

Reheating Rice: कधीतरी जेवण बनवायला कंटाळा आला की महिला भात किंवा मग खिचडीचा बेत ठरवून मोकळ्या होतात. जवळपास प्रत्येक घरात रोजच्या जेवणात भाताचा समावेश असतोच. वेगवेगळ्या रुपात आपण भाताचे सेवन करतो. भात बनवायला सुद्धा सोपा असल्यामुळे आहारात तो मुख्य खाद्यपदार्थ मानला जातो. परंतु, अनेकदा लोक भात पुन्हा गरम करुन खातात आणि यामुळे शरीरावर याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. 

खरंतर, शिजवलेल्या भातात बेसिलस सेरियस हा आरोग्यासाठी घातक असलेला जीवाणू असतो. भात शिजवल्यावर सुद्धा हे जीवाणू नष्ट होत नाहीत, ते तसेच टिकून राहतात. बेसिलस सेरियस हा जीवाणू खोलीच्या तापमानात अधिक काळ ठेवल्यास त्याची वाढ होऊ शकते. पुन्हा गरम केल्यावर हे विषारी जीवाणू नष्ट होत नाहीत. आपल्यापैकी अनेकजण उरलेला भात गरम करुन पुन्हा गरम करुन तो खातात. मात्र, जीवाणूंची वाढ झाल्यामुळे अशा भाताचे सेवन करणे हे अतिसार, उलट्या तसेच विषबाधा अशा समस्यांना कारणीभूत ठरते.

पोषकत्त्वांची कमतरता

भात पुन्हा गरम केल्यामुळे त्यातील पोषकत्त्वांचे प्रमाण कमी होते. तसेच, शिजवलेला भात पुन्हा गरम केल्यामुळे त्यात मुबलक प्रमाणात असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण कमी होते. अशा भाताचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक त्या प्रमाणात पोषकत्त्वे मिळत नाहीत. 

भाताची चव आणि पोत कमी होणे

भात पुन्हा गरम केल्यामुळे कोरडा, चिकट आणि कडक होतो ज्यामुळे चव कमी होते. ताज्या शिजवलेल्या भाताची चव पुन्हा गरम केलेल्या भाताला नसते. 

असमान तापमान

भात पुन्हा गरम करताना त्याला सगळीकडे समान तापमान मिळत नाही. यामुळे भात काही ठिकाणी जास्त गरम होते तरी भाताचा काही भाग हा थंड राहतो. पुरेसं तापमान मिळालं नसल्यामुळे भातात काही ठिकाणी बॅक्टेरिया आणि विषारी जीवाणू तसेच राहतात. यामुळे गंभीर आजार ओढवू शकतात. 

खराब होण्याची अधिक शक्यता

शिळा किंवा उरलेला भात योग्यरित्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवला पाहिजे. खोलीच्या तापमानात अधिक काळ भात ठेवल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि जीवाणूंची वाढ होते, जे पुन्हा गरम करुनही नष्ट होत नाहीत. अशावेळी भात खराब होण्याची शक्यता असते. 

स्टार्चचे अधिक प्रमाण

भात पुन्हा शिजवलेल्याने त्यातील स्टार्चचे प्रमाण वाढते आणि यामुळे पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात. अशाप्रकारे भाताचे सेवन केल्याने पोटात ब्लोटींग, अपचन आणि गॅसच्या समस्या होऊ शकतात. पुन्हा गरम केलेल्या भाताचे सेवन रक्तातील शूगरची पातळी वाढण्याला कारणीभूत ठरते. 

कस करावे भाताचे सेवन? 

उरलेला भात हा शिजवल्याच्या 1 तासाच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. भात एकापेक्षा जास्त वेळा गरम करुन खाऊ नका. 

भात गरम करायचा झाल्यास तो परिपूर्ण आणि योग्यरित्या गरम करा.

पुन्हा गरम केलेला भात खोलीच्या तापमानात अधिक काळ ठेऊ नका. गरम केल्यानंतर लगेचच त्याचे सेवन करा.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)