मुंबई : आजकाल डायबिटीज म्हणजेच मधुमेह सारखा आजार अनेकांना झाल्याचे पाहायला मिळते. मधुमेह आजार ऐकण्यास सामान्य वाटत असला तरी मधुमेहाचे अनेक दुष्परिणामही आहेत. मधुमेह कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. मधुमेह साधारणत: अधिक गोड पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना होत असल्याचा सर्वसाधारण समज आहे. परंतु हा समज पूर्णत: योग्य नाही. मधुमेह हा जीवनशैलीशी निगडित असलेला आजार असून मधुमेह होण्याचीही अनेक कारणं आहेत.
चुकीची, वाईट जीवनशैली हे मधुमेह होण्याचं प्रमुख कारण आहे. कमी वयातही मधुमेह होण्याचं एक कारण म्हणजे राहणीमान आणि खाणं-पिणं. मधुमेह होऊ द्यायचा नसल्याचा दररोज व्यायाम आणि आरोग्यदायी, हेल्दी आहार घेणं गरजेच आहे. शारीरिकरित्या निष्क्रियता असणाऱ्या मुलांमध्ये मधुमेह अधिक वाढीस लागला आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवांशिकता. कुटुंबात आई-वडिल, बहिण-भाऊ यापैकी कोणालाही मधुमेह असल्यास भविष्यात तो मुलांमध्ये येण्याची शक्यता असते.
वेळेवर न खाणं, मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खाणं, त्यामुळे वाढलेलं वजन हेही मधुमेहाचं प्रमुख कारण आहे. वजन वाढलेलं असल्यास रक्तदाब उच्च राहतो त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका असतो. अधिक गोड खाणं, नियमितपणे बाहेरचं खाणं, पाणी कमी पिणं, व्यायाम न करणं यामुळे मधुमेह बळावण्याची शक्यता असते.
मानवी शरीरात पेंक्रियाज ग्रंथीमुळे हार्मोन्स तयार होतात. त्यापैकी एक इंन्सुलीन आणि ग्लूकॉन आहे. इंन्सुलीन मानवी शरीरासाठी महत्त्वाचं काम करते. मधुमेह झाल्याने शरीरात इंन्सुलीनचे प्रमाण कमी होते आणि रक्तात साखरेचं प्रमाण अधिक होते. इंन्सुलीन न बनल्यामुळे रक्तातील साखर वाढल्यामुळे शरीराला हानी पोहचते.