मुंबई : कडुनिंबाचा पाला आणि त्याचे देठ आपल्या आरोग्यास फार गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात.'चरकसंहिता' या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख सर्व रोग निवारिणी तथा आरिष्ट असा केला आहे. कडुनिंब वृक्ष नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. या झाडाची पाने, फळे, बिया अत्यंत कडू असतात. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वर, महारोग, बाळंतरोग, अफूच्या उतारासाठी, जखम, मुळव्याध, मधुमेह इ. रोगांवर कडुनिंबाचे झाड फायदेशीर आहे. कडुनिंबाचे झाड ज्या ठिकाणी जास्त असते तेथील हवा फार शुद्ध राहते.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढून अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. अशा रोगांचे प्रमाण कमी करण्यासाठी कडुलिंब अधिक प्रभावशली आहे. कडुनिंबामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
कडुनिंबाने आरोग्यास होणारे फायदे :
- उन्हाळ्यात कडुनिंबाचं रस प्यायल्याने उन्हाचा त्रास होत नाही.
- रोज ग्लासभर हा रस प्यायल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
- कडुनिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे विकार होत नाहीत. त्याचप्रमाणे दातांना बळकटी येते.
- कडुनिंबाची पाने धान्यात घालून ठेवल्यास धन्याला कीड किंवा अळी लागत नाही.
- सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन यांमध्ये देखील कडुनिंबाचा वापर करण्यात येतो.
- कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायची आणि ते तेल नियमितपणे लावल्याने केसांची वाढ जोमाने होते. केसांच्या अनेक समस्या दूर होतात.
- पोटात जंत झाले तर पानांचा रस काढून एक चमचा रसात थोडे गूळ घालून तीन दिवस प्याल्यास जंत बाहेर पडतात.