घरगुती उपायांनी करा थकलेल्या डोळ्यांना रिफ्रेश

जास्त वेळ लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहण्यामुळे डोळे थकतात आणि डोळ्यांवर ताण येतो. 

Updated: Jul 3, 2021, 03:12 PM IST
घरगुती उपायांनी करा थकलेल्या डोळ्यांना रिफ्रेश title=

मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्या कामाचं तसंच लाईफस्टाईलचं सर्वच गणित बदललं आहे. या काळात ज्यांना शक्य आहे त्यांना वर्क फॉर्म होम देण्यात आलेलं आहे. तर शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील ऑनलाईन क्लास सुरु केलं आहेत. परिणामी सध्याच्या काळात बहुतांश लोकं लॅपटॉपच्या स्क्रिनसमोर बसून आहेत. जास्त वेळ लॅपटॉपच्या स्क्रीनवर पाहण्यामुळे डोळे थकतात आणि डोळ्यांवर ताण येतो. 

अशा परिस्थितीत डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय वापरून तुम्ही डोळ्यांचा थकवा दूर करू शकता.

गुलाब पाण्याचा वापर

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्याचा वापर करू शकता शकता. यासाठी एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि त्यात गुलाबाचं पाणी मिसळा. यानंतर त्यात कापूस भिजवा आणि डोळ्यावर ठेवा. पाच मिनिटांनंतर हा कापूस काढा. असं दिवसातून तीन ते चार वेळा करू शकता. डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

थंड पाणी मारा

अनेक तास स्क्रीनसमोर बसून काम केल्याने डोळे दुखु लागतात आणि जळजळतात. हा त्रास दूर करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. कामातून ब्रेक घ्यावा आणि थंड पाणी डोळ्यांवर शिंपडावं. असं केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल आणि ताणही निघून जाईल.

पुदीना आणि तुळशीच्या पानांचा वापर

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुळस आणि पुदिन्याचाही तुम्ही वापर करू शकता. यासाठी तुळस आणि पुदिनाची पानं रात्रभर पाण्यात ठेवा. दुसर्‍या दिवशी कापूस या पाण्यात भिजवून तो डोळ्यावर ठेवावा. असं केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होईल. त्वचादेखील तणावमुक्त होण्यास मदत होते.