तुमच्या दिवसाची सुरुवातही सोशल मीडियानेच होते? तुम्हाला हा आजार तर नाही?

तासन् तास हेच करत असाल तर आताच थांबा

Updated: Mar 31, 2022, 08:54 AM IST
तुमच्या दिवसाची सुरुवातही सोशल मीडियानेच होते? तुम्हाला हा आजार तर नाही?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत तेव्हापासून आणखी एक गोष्ट आपला पाठलाग करु लागली आहे. ही गोष्ट जरा जास्तच गंभीर आहे. दिवसाची सुरुवात तुम्हीही मोबाईल हातात घेऊन थेट सोशल मीडियावर फेरफटका मारत करत असाल आणि तासन् तास हेच करत असाल तर आताच थांबा. 

कारण सोशल मीडियाचा (Social media) प्रमाणाबाहेरील वापर विविध वयोगटातील मुलामुलींच्या आरोग्यावर परिणाम करु लागला आहे. 

कमी वयात जास्त प्रभाव

एका निरिक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार आणि मनोवैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार ज्या मुली 11 ते 13 वयोगटात सर्वाधिक काळ सोशल मीडिया सर्फिंगवर घालवतात, त्या एका वर्षानंतर आपल्या आयुष्यात बऱ्याच अंशी असंतुष्ट असतात. 

या तुलनेत मुलांमध्ये दिसणारे हे परिणाम 14 ते 15 वर्षे या वयोगटात दिसून आले. इतर कोणत्याही वयोगटात अभ्यासकांना ही बाब आढळली नाही. 

असं असलं तरीही 19 व्या वर्षी मुली आणि मुलांच्या असंतुष्टतेमध्ये मात्र घट झाल्याचं दिसून आलं. 

केंब्रिज विद्यापीठातील (Cambridge University) संशोधनाचे लेखक डॉ. एमी ओरबेन यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलं आणि मुलींचा एक ठराविक वयोगट आहे, जेव्हा सोशल मीडियाचाय त्यांच्यावर परिणाम दिसून येतो. 

5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलामुलींमध्ये मानसिक आरोग्य ढासळण्याचं प्रमाण 2017 ते 2021 दरम्यान 50 टक्क्यांनी वाढलं. थोडक्यात प्रत्येक इयत्तेत असे पाच विद्यार्थीतरी आहेत. 

यावर उपाय काय ? 

जेव्हा सोशल मीडियाचा वापर मुलं करतात तेव्हा पालकांनी त्यांच्यासाठी काही नियम आखून द्यावेत जेणेकरुन मुलांच्या झोपेची वेळ कमी होणार नाही.

सोशल मीडियावर समोर येणारी प्रत्येक गोष्ट अतिशय कमी वयातच नव्हे, तर कोणत्याही वयोगटात व्यक्तीच्या मनावर परिणाम तरुन जाते. त्यामुळं पाहिलेली गोष्ट किती गांभीर्यानं घ्यावी आणि कितीवेळ तिचा विचार करावा ही बाब प्रत्येक व्यक्तीनं स्वत:हून ठरवावं. 

जेणेकरुन मानसिक आरोग्याचं संकट ओढावणार नाही आणि ओढावल्यास योग्य वेळीच ते थोपवताही येईल.