Influenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले

H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

Updated: Mar 16, 2023, 08:37 PM IST
Influenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले

H3N2 Influenza News: कोरोना महामारीचं (Corona) संकट कमी होतंय, असं वाटत असतानाच आता देशासमोर नवं संकट उभं ठाकलंय. भारतात H3N2 इन्फ्ल्यूएंजा व्हायरसचे (H3N2 Influenza Virus) रुग्ण वेगाने वाढतायत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचं पाहिला मिळतंय. गेल्या 24 तासात कोरोनाचे 426 नवे रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा (Corona Death) मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या भारतात 4623 सक्रिय रुग्ण आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रात 125 रुग्ण आहेत. गुजरात 68, कर्नाटक 42, केरळ 36 आणि दिल्लीत कोरोनाची 31 प्रकरणं समोर आली आहेत. वेगाने पसरतोय H3N2 व्हायरसमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचं पहिलं प्रकरण 10 मार्चला नोंदवलं गेलं. कर्नाटकमध्ये एका 82 वर्षांच्या वृद्धाचा H3N2 मुळे मृत्यू झाला. त्यानंतर 10 मार्चलाच हरियाणात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. 14 मार्चला गुजरातमधल्या वडोदरात 58 वर्षांच्या महिलेचा व्हायरस संक्रमणामुळे मृत्यू झाला. 15 मार्चला महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात 23 वर्षांच्या मेडिकल विद्यार्थ्याचा H3N2 व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. हा विद्यार्थी कोकणातून पिकनीकवरुन घरी परतला होता. तपासात त्याला कोरोनाची लागण झाल्याचंही आढळून आलं होतं. 

महाराष्ट्रातल्या नागपूरमध्येही 74 वर्षीय वृद्धाचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. त्याला श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. H3N2 रुग्णांच्या आकडेवारीचा निश्चित डाटा अजून सर्व राज्यांकडून आलेला नाही, त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डाटा अपडेट केला नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार H3N2 चे आतापर्यंत 3038 प्रकरणांची नोंद झाली आहे. 

महाराष्ट्रात यंत्रणा पुन्हा सज्ज करणार
H3N2च्या धर्तीवर राज्यात कोविड काळात उभारण्यात आलेली यंत्रणा पुन्हा ऍक्टिव्ह केली जाणारंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) नुकताच संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.  इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. 

H3N2 ची ही आहेत लक्षणं
H3N2 संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसंच सध्या सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमुन उपचाराचे काम सुरु ठेवावे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A B आणि C,असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला,घशात खवखव , धाप लागणे , न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात. 

रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. सर्दी खोकला अंगावर काढु नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लुवरील औषध सुरु करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा.आजारी व्यकतीनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.