देशात कोरोनाची तिसरी लाट? केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम

देशात सर्वात जास्त कोरोनाची प्रकरणं ही केरळमध्ये दिसून येत आहेत. 

Updated: Aug 29, 2021, 01:36 PM IST
देशात कोरोनाची तिसरी लाट? केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम title=

मुंबई : देशात काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोविडची 45,083 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर, आता देशातील कोरोना प्रकरणांची एकूण संख्या 3,26,95,030 झाली आहे. यासह, 460 मृत्यू नंतर मृतांची संख्या 4,37,830 झाली आहे. 

मुख्य म्हणजे देशात सर्वात जास्त कोरोनाची प्रकरणं ही केरळमध्ये दिसून येत आहेत. तर मृत्यूंची अधिक संख्या देखील केरळ राज्यात नोंदवली आहे. एकूण या आकडेवारीवरून, देशात तिसरी लाट आलीये का हा प्रश्न उपस्थित होतोय.

केरळमध्ये एका दिवसात 31 हजारांहून अधिक प्रकरणांची नोंद

देशात नोंदवण्यात आलेल्या 45 हजारांहून अधिक प्रकरणांपैकी केरळमध्ये आहेत. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 31,265 कोरोनाची प्रकरणं आणि 153 मृत्यूची नोंद झाली आहे. ओणमसाठी आणि त्यापूर्वी मोहरमपूर्वी देण्यात आलेल्या शिथिलतेपासून राज्यात कोरोनासंबंधी परिस्थिती बिघडताना दिसतेय. यामुळे केंद्राने रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा सल्लाही दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 4831 नवीन प्रकरणं

महाराष्ट्रात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 4,831 नवीन प्रकरणे नोंदली गेली. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या मते, नवीन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 64,52,273 झाली आहे.

सध्याचा देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट 2.28 टक्क्यांवर आहे. गेल्या 65 दिवसांपासून हा दर 3 टक्क्यांपेक्षा खाली आहे. तर दिवसाचा पॉझिटीव्हीटी रेट देखील गेल्या 34 दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी 2.57 टक्क्यांवर आहे.