उन्हात पाय टॅन झालेत का? मग 'हे' 5 उपाय करुन पाहा, फरक नक्की जाणवेल

धूळ, माती आणि घामावर सन टॅनचा इतका खोल परिणाम होतो की, पाय काळे आणि घाणेरडे दिसू लागतात.

Updated: Apr 29, 2022, 09:49 PM IST
उन्हात पाय टॅन झालेत का? मग 'हे' 5 उपाय करुन पाहा, फरक नक्की जाणवेल title=

मुंबई : कडक उन्हाच्या झळा खूप मोठ्याप्रमाणात आपल्याला जाणवू लागल्या आहेत. ज्यामुळे आपली स्किन टॅन पडू लागली आहे. ज्यामुळे बरेच लोक उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी क्रिम लावणे, स्कार्फ बांधणे यासारखे पर्यायांकडे वळले आहे. परंतु आपल्या हाताच्या आणि पायाच्या त्वचेचं काय? त्याच्यावर देखील सुर्याच्या किरणांचा प्रभाव पडून ती स्किन टॅन होऊ लागते.

बरं पायांना टॅनिंगपासून वाचवण्यासाठी आपण शूज घालू शकत नाही. कारण इतक्या उष्णतेमध्ये शूज घालणे देखील खूप कठीण आहे. मग जर अशापरिस्थीतीत चप्पल घातली तरी देखील स्किन टॅन होते. धूळ, माती आणि घामावर सन टॅनचा इतका खोल परिणाम होतो की, पाय काळे आणि घाणेरडे दिसू लागतात, जसे की आपण वर्षानुवर्षे पाय धुतलेच नाही.

या समस्येचा सामना करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जे तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून वाचवण्यासाठी मदत करु शकतात. 

या टीप्समुळे तुमच्या पायाचे टॅनिंग तर दूर होईलच शिवाय तुमचे पाय पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक चमकू लागतील.

चला तर जाणून घेऊया हे घरगुती उपाय कोणते आहेत.

बेसन आणि दही

पायावरील उन्हाचा काळेपणा दूर करण्यासाठी ही टीप खूप प्रभावी आहे. दही आणि बेसन एकत्र मिक्स करून 15-20 मिनिटे पायाला लावून ठेवा आणि नंतर पाय धुवा. दही पायाला मॉइश्चरायझ करेल आणि टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन काम करेल. अधिक प्रभावासाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील घालू शकता.

बटाटा आणि लिंबू

अर्धा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि त्यात लिंबू पिळून घ्या. आता हा तयार रस 15 ते 20 मिनिटे पायावर ठेवल्यानंतर तो धुवा. यानंतर तुमच्या पायावर जी चमक येईल ती तुम्हाला आश्चर्यचकीत करेल.

ओट्स आणि दही

ओट्स बारीक करून त्यात दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. त्यात तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता. हा तयार पॅक पायाला स्क्रब करा आणि 15 मिनिटे पायावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. पायांचा रंग लाईट झालेलं तुमच्या लगेच लक्षात येईल.

चंदन आणि मध

एका भांड्यात एक मोठा चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्हाला अर्धा तास पायांवर ठेवावी लागेल. चांगल्या परिणामासाठी तुम्ही ते आठवड्यातून दोनदा लागू करू शकता.

पपई आणि मध

पपई उन्हाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाते, परंतु, टॅनिंग दूर करण्यासाठी देखील ती खूप प्रभावी आहे. गरजेनुसार पपईची पेस्ट घ्या, त्यात अर्धा चमचा मध मिसळून काळ्या झालेल्या पायावर लावा. 20 ते 25 मिनिटांनी धुतल्यानंतर तुम्हाला पायातील टॅनिंग निघून गेलेली दिसेल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)