काश्मिर : आजकाल सारेच इंटरनेटच्या विळख्यात अडकल्याने त्यांना सोशलमीडियाचं व्यसन जडलं आहे. असा सर्रास ठप्पा मारला जातो. मात्र जम्मू काश्मिरमध्ये मात्र व्हॉट्सअॅपमुळे एका व्यक्तीचा जीव वाचवण्यास मदत झाली आहे. व्हॉट्स अॅपच्या मदतीने एका डॉक्टरने रुग्णाचे प्राण वाचवले आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, 27 वर्षीय बिलाल अहमदच्या छातीत दुखू लागल्याने त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. इसीजी काढल्यानंतर हा हार्ट अटॅक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्या सिनियरशी या केस बाबत सल्ला घेतला. तेव्हा थोंबोलिसिस या रक्तवाहिन्यातील क्लॉट संपवण्याचे औषध रूग्णाला तात्काळ देण्याचा सल्ला देण्यात आला. तात्काळ मिळालेल्या या सल्ल्यामुळे रूग्णाचे प्राण वाचवण्यास मदत झाली.
डॉ. नजम यांच्या सल्ल्यानुसार, कोणत्याही हृद्यविकाराच्या झटक्यानंतर त्यानंतरचा पहिला एक तास महत्त्वाचा असतो. या तासाभरात योग्य उपचार मिळाल्यास रूग्णाचे प्राण वाचवले जातात.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यापासून काश्मीर डिरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसने खास सुविधा सुरू केली आहे. यानुसार, दूर राहणार्या लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा आणि वैद्यकीय सल्ला मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप मदत करत आहे. कठीण प्रसंगामध्ये काही वरिष्ठ डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. त्यामुळे रूग्णांना वेळीच योग्य सल्ला देऊन त्यांचे प्राण वाचवण्यास मदत होते.
जम्मू काश्मिरमध्ये शेर ए कश्मीर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एसकेआईएमएस) आणि श्री महाराजा हरिसिंह हॉस्पिटल (एसएमएचएस) या दोन मोठ्या हॉस्पिटलवर अवलंबून असतात. मात्र इतर लहानसहान हॉस्पिटलमध्येही रूग्णांना तात्काळ मदत देण्यासाठी हा उपक्रम मदत करत आहे.