गणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक

गणेश विसर्जनानंतर लहान मुलांमध्ये HFMD चे संक्रमण सर्वाधिक वाढले आहे. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत आहे. कोणत्या आजाराचा व्हायरस आहे? याची लक्षणे आणि उपाय समजून घ्या.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 21, 2024, 01:32 PM IST
गणपतीत मुलांना घेऊन फिरला असाल तर वेळीच सावध व्हा; नवीन साथ ठरु शकते धोकादायक  title=

HFMD म्हणजे हँट, फूट-माऊथ डिजिज (Hand, Foot, and Mouth Disease) हा एक संक्रमित आजार आहे. जो खास करुन लहान मुलांमध्ये पसरत आहे. याचं प्रमुख कॉक्ससैकी व्हायरस आणि एंटरव्हायरस आहे. HFMD ची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, घश्यात जळजळ आणि हात-पाय आणि तोंडात फोड येणे. या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यापासून बचावाचे उपाय समजून घ्या. या संदर्भात आम्ही, बालरोगतज्ज्ञ डॉ. हिना पंडितपुत्र यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे. 

हा आजार कसा पसरतो? 

हात, पाय आणि तोंड यामध्ये होणारा हा आजार HFMD नावाने ओळखला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे कॉक्ससॅकी व्हायरस A16 आणि एन्टरोव्हायरस 71. हे विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतात. हा विषाणू खोकला, शिंकणे, लाळ, अनुनासिक स्राव आणि विष्ठेद्वारे पसरतो. संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श करून किंवा संक्रमित व्यक्तीच्या जवळ आल्याने देखील हा रोग पसरू शकतो. लहान मुले, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे या आजारासाठी ते अधिक संवेदनशील असते. त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आणि संक्रमित व्यक्तींपासून अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे.

HFMD ची लक्षणे

संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांनी HFMD ची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे सहसा 3-7 दिवसात विकसित होतात. या लक्षणांचा समावेश होतो. ताप: HFMD सहसा तापाने सुरू होतो. ताप सौम्य किंवा जास्त असू शकतो आणि तो कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेनचा वापर केला जाऊ शकतो.

घसा खवखवणे: घशात वेदना आणि सूज येऊ शकते, ज्यामुळे मुलाला खाणे आणि पिण्यास त्रास होतो.

थकवा आणि अशक्तपणा: मुलाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असते.

तोंडात व्रण: तोंडात छोटे व्रण किंवा फोड असू शकतात. जे वेदनादायक असतात आणि मुलाला खाणे पिणे कठीण होऊ शकते.

पुरळ: हात, पाय आणि कधीकधी नितंबांवर लाल पुरळ किंवा डाग दिसतात. या पुरळांमुळे खाज किंवा वेदना होऊ शकतात.

HFMD उपचार

HFMD साठी कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु लक्षणे नियंत्रित केली जातात.

  • ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन द्या.
  • तोंडाचे व्रण शांत करण्यासाठी, थंड दूध किंवा पाणी यासारखे थंड द्रव प्या.
  • मुलाला विश्रांती द्या आणि त्याला अधिक पाणी द्या जेणेकरून त्याला निर्जलीकरण होणार नाही.
  • हलके आणि मऊ अन्न जसे की दलिया, सूप किंवा दही द्या, जेणेकरून मुलाला खायला त्रास होणार नाही.
  • जर मुलाला खूप अस्वस्थ वाटत असेल किंवा त्याची लक्षणे खराब झाली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

प्रतिबंधात्मक उपाय

साबणाने आणि पाण्याने हात धुणे: तुमचे आणि तुमच्या मुलांचे हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवा, खास करून जेवण्यापूर्वी आणि शौचालयात गेल्यानंतर.
संक्रमित व्यक्तीपासून अंतर राखणे: जर एखाद्याला एचएफएमडी असेल तर त्याच्यापासून अंतर ठेवा. त्याचे कपडे, भांडी आणि खेळणी वेगळी ठेवा आणि ती पूर्णपणे स्वच्छ करा.
स्वच्छता राखा: मुलांना स्वच्छ ठेवा आणि त्यांची खेळणी रोज स्वच्छ करा. घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.
गर्दीची ठिकाणे टाळा: मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे टाळा, जिथे संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते.

डॉक्टर काय सांगतात? 

डॉ. हिना यांच्या माहितीनुसार, गर्दीच्या ठिकाणी HFMD या आजाराचे संक्रमण अधिक होते. नुकतेच गणपतीसाठी गावी गेलेल्या मुलांमध्ये ही लक्षणे सर्वाधिक जाणून येत आहेत. न घाबरता पालकांनी या आजारातून मुलांना बरे करायचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉ. हिना पंडितपुत्र करत आहेत.

 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)