मुंबई : रोजच्या धवपळीच्या आयुष्यात लोकांना स्वत:च्या आरोग्याकडे पाहण्यासाठी वेळ नसतो, ज्याचा परिणाम हळूहळू त्यांच्या शरीरावर होऊ लागतो. जसे की, वजन वाढणे आणि शरीर दुखणे इत्यादी. अशावेळी बरेच लोक ग्रीन टीच्या पर्यायाकडे वळतात. असे म्हणतात की ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. अशा स्थितीत शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते. शरीराचे वाढते वजन कमी करण्यासाठी विशेषतः ग्रीन टीचा वापर केला जातो. परंतु आपण शरीराचा फायदा करण्यासाठी घेत असलेली ग्रीन टी आपल्या शरीराचं नुकसान देखील करते हे तुम्हाला माहितीय?
हो हे खरं आहे. त्यामुळे तुम्ही देखील जास्त प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करत असाल, तर सावध व्हा. कारण ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. चला जाणून घेऊया जास्त प्रमाणात ग्रीन टी पिण्याचे तोटे काय आहेत.
दिवसातून अनेक कप ग्रीन टीचे सेवन केल्यास डोकेदुखीची समस्या वाढू शकते. वास्तविक, ग्रीन टीमध्ये कॅफिन देखील असते. शरीरात कॅफीनचे प्रमाण जास्त झाल्याने डोकेदुखीची समस्या वाढते. त्यामुळे हे देखील लक्षात घ्या की, डोकं दुखतंय म्हणून अनेक लोक ग्रीन टी पितात, परंतु अशावेळी ग्रीन टी पासून लांब राहा.
ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृताशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.
जर तुम्ही दिवसभर ग्रीन टी जास्त प्यायली, तर त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटदुखी, गॅस, ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
दिवसभरात 3 ते 4 कप पेक्षा जास्त ग्रीन टीचे सेवन केल्याने मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे दिवसातून २ ते ३ कप पेक्षा जास्त ग्रीन टी न पिण्याचा प्रयत्न करा.
ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात. त्याचा हाडांच्या घनतेवर परिणाम होतो. यामुळे सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो.
दिवसातून अनेक कप ग्रीन टी प्यायल्याने शरीरात अॅनिमिया होऊ शकतो. हे तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी करते, ज्यामुळे लोहाची कमतरता होण्याची शक्यता वाढते.