मुंबई : गाम्बियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाल्याने भारतीय सिरप कंपनी चौकशीच्या जाळ्यात आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने त्यांनी केलेल्या तपासाबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिलीये.
मिळालेल्या माहितीनुसार, या समितीला तपासणीमध्ये असं आढळून आलंय की, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली क्लिनिकल माहिती एटिओलॉजीसाठी अपुरी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) व्हीजी सोमाणी यांनी WHO ला याबाबत माहिती दिलीये. शनिवारी ही माहिती देण्यात आली.
WHO चे रुतेंदो कुवाना यांनी 13 ऑक्टोबरला DCGI ला एक मेल लिहला होता. या मेलमध्ये सोनीपत, मेडेन फार्मास्युटिकल्स इथल्या 4 कफ सिरप प्रोडक्ट्सच्या तपास प्रकरणातील माहिती मागितली.
याला उत्तर देत डॉ. सोमाणी यांनी शनिवारी सांगितलं की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घटना अहवाल आणि डब्ल्यूएचओद्वारे सामायिक केलेल्या किंवा सार्वजनिक केलेल्या तपशीलांचे परीक्षण आणि विश्लेषण करण्यासाठी तांत्रिक तज्ञांची समिती स्थापन केलीये.
ते पुढे म्हणाले की, औषधांसंबंधीच्या स्थायी राष्ट्रीय समितीचे उपाध्यक्ष डॉ. वाय.के. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील 4 सदस्यीय समितीने आपल्या पहिल्या बैठकीत WHO कडून आतापर्यंत मिळालेल्या रिपोर्टच्या आधारे अनेक गोष्टी नोंदवल्या. त्यानुसार WHO ने आत्तापर्यंत दिलेली क्लिनिकची वैशिष्ट्यं आणि उपचार एटिओलॉजी निश्चित करण्यासाठी अपुरे आहेत.