स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या आहारात असायलाच हवेत हे '६' पदार्थ!

स्तनपान कराताना प्रत्येक आई आपल्या आहाराबाबत जागरुक असते.

Updated: Jun 29, 2018, 09:42 AM IST
स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या आहारात असायलाच हवेत हे '६' पदार्थ! title=

मुंबई : मातृत्वाच्या टप्प्यावर जेव्हा स्तनपान करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक आई आपल्या आहाराबाबत जागरूक होते. आपल्या बाळाला पुरेसं दूध मिळावं व आपल्याला ही उत्साही, आरोग्यदायी वाटावं असं प्रत्येकीला वाटत. अशाच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी काही पोषक अन्नपदार्थ...

जर्दाळू:

जर्दाळू खाल्ल्याने स्त्रियांच्या शरीरात दुधाची निर्मिती अधिक प्रमाणात होते. ताजे जर्दाळू खाणे उत्तम ठरेल. पण हवाबंद डब्यातील जर्दाळू विकत घेणार असाल तर शुगर सिरप ऐवजी नैसर्गिक रसात पॅक केलेले जर्दाळू विकत घ्या.

खजूर:

लोह आणि कॅल्शिअमने युक्त असे खजूर खाल्याने दुधाच्या निर्मितीत वाढ होते. रोज अर्ध्या कप खारीक खाल्याने तुमची दिवसभराची गरज भागवली जाते.

कोबीची पाने:

स्तनपान करत असताना बाळाला पोषकतत्त्व पुरवण्यासाठी शरीराला अधिक कॅलरीजची गरज भासते. कोबीच्या पानात अधिक प्रमाणात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि के असते. आहारात पालेभाज्या जरूर घ्या. मधल्या वेळेत कोबीच्या पानांचे चिप्स खाल्ल्याने काहीतरी वेगळे खाल्ल्याचा आनंद नक्की मिळेल.

भोपळा आणि त्यासारख्या अन्य भाज्या:

दुधीभोपळा, भोपळा, शिराळ यांसारख्या भाज्या दूध निर्मितीस मदत करतात. त्याचबरोबर यात भरपूर पौष्टीक घटक असून पचनास ही हलक्या असतात.

मेथी:

यात मुबलक प्रमाणात लोह आणि कॅल्शिअम असल्याने स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी उत्तम आहे. कारण यामुळे दूध निर्मितीस चालना मिळते. तसंच यात galactagogues असल्याने स्त्रिच्या शरीरात दूध तयार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे इतर भाज्यांवर घालून खा किंवा ग्लासभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या.

तूप:

तुपामुळे दूध निर्मितीचे कार्य अधिक सक्रिय होते. तसेच त्यातून अनेक पोषकघटक मिळतात ज्यामुळे हाडं मजबूत होतात. तुम्ही काही भाज्या तेलाऐवजी तुपात बनवू शकता.