Fitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून किती किलोमीटर चालणं फायदेशीर?

लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतेय.

Updated: Jul 3, 2022, 06:57 AM IST
Fitness Tips : फीट राहण्यासाठी दिवसातून किती किलोमीटर चालणं फायदेशीर?  title=

मुंबई : आजच्या व्यस्त जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे हे मोठं आव्हान आहे. लोकांची बिघडलेली लाईफस्टाईल त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतेय. अशातच जर तुम्हाला स्वतःला फीट अँड फाईन ठेवायचं असेल तर तुम्हाला रोज चालावं लागतं. 

मात्र उत्तम आरोग्यासाठी दररोज किती किलोमीटर चालावं, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. दररोज चालण्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. तर आज जाणून घेऊया निरोगी राहण्यासाठी दिवसात किती किलोमीटर चालणं आवश्यक आहे.

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, फिट राहण्यासाठी प्रौढ व्यक्तीने दररोज सुमारे 10000 पावलं चालणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर तर हे अंतर सुमारे 8 किलोमीटर आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे अंतर आणखी वाढवू शकता.

चालणं हा एक प्रकारचा व्यायाम आहे, जो तुम्हाला शारीरिकदृष्टा तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. इतकंच नाही तर अनेक लोकांसाठी हे वजन कमी करण्यातही प्रभावी ठरते. जरी चालण्याचे अनेक प्रकार आहेत, परंतु आपण सामान्य चालणं आपल्या दैनंदिन दिनचर्याचा एक भाग बनवू शकता.

दररोज पायी चालण्याचे फायदे

आर्थरायटिस फाऊंडेशनने चालण्याच्या फायद्यांसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, दररोज चालण्याने स्नायू मजबूत होतात, रक्त प्रवाह सुधारतो त्याचप्रमाणे लवचिकता वाढते. याशिवाय चालण्याने वृद्धांमध्ये सांधे जडपणा, लठ्ठपणा, ऑस्टिओपोरोसिस आणि स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होतो.