मुंबई : आजकाल तुम्ही किती फीट आहात यापेक्षा तुम्ही किती स्लिम ट्रीम आहात? याकडेच अधिक लक्ष लागलेले असते. त्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मॉडर्न वातावरणातील फॅशनला शोभेल अशी स्वतःची शरीरयष्टी ठेवण्याकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. अशक्तपणा आला तरी चालेल, हिमोग्लोबिन कमी झाले तरी चालेल पण शरीरयष्टी चित्रपटात झळकणार्या कलाकाराप्रमाणे असावी असे अनेकांच्या मनात येते. स्लिम-ट्रिम रहावे ही आधुनिक काळातील फॅशनच्या दुनियाची गरज आहे. परंतू शरीराला त्रास न होता स्लिम होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याकरिता डॉ.कविता लड्डा यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
1.वजन कमी करण्यापूर्वी स्वतःच्या शरीराला समजून घ्या. खरच तुमचे वजन जास्त आहे का ? आपल्या वयानुसार, उंचीनुसार आपणास किती वजन आवश्यक आहे व किती किलो वजन कमी करावयाचे आहे हे समजुन घ्या.
2. आवश्यक ते वजन कमी करण्यासाठी दीर्घकालीन वेळापत्रकाचे नियोजन करा. पण छोटया टप्यांद्वारे कार्यक्रमाचे नियोजन करा. उदा. जर तुम्हाला २० किलो वजन कमी करावयाचे आहे तर ४ किलोचे ५ टप्पे किंवा ५ किलोचे ४ टप्पे आखा. प्रत्येक टप्यावर हिशोब करा की आपण दीर्घकालीन वेळापत्रकानुसारच चालत आहोत की नाही.
3. तुम्ही दररोज काय खाता किंवा पिता याची दैनंदिनी लिहुन ठेवा. दररोज संध्याकाळी याचा हिशोब करा. यामध्ये कोणते पदार्थ टाळता येतीत ते पहा.
4. तुमच्या दररोजच्या आहाराबद्दल जागरूक व्हा. दिवसातून दोन वेळा पोटभरून जेवण करण्यापेक्षा तेच विभागुन ४ ते ५ वेळा खा.
5. कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळचा नाष्टा चुकवू नका. सकाळी घेतलेल्या नाष्ट्याद्वारे आपणास दिवसभर काम करण्यासाठी लागणा-या एनर्जीचा पुरवठा होत असतो.
6. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्याची सवय लावणे उपयुक्त आहे.
7. तणाव मुक्त होऊन आणि प्रसन्नचित्ताने जेवण करा. वजन कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारे उपाशी राहू नका. उपाशी राहून वजन कमी केल्याने वजन लवकर कमी होते मात्र ते तितक्याच झपाटयाने पुन्हा वाढते.
8. आहारामध्ये ‘त्याऐवजी’ या शब्दाला विशेष महत्व द्या. दररोज तेच पोहे, उपीट, शिरा, इडली, डोसा, ब्रेड, बिस्किट, चपाती, भाकरी, भात, भाजी खाण्यापेक्षा "त्याऐवजी" पोटभरून फळे, फळांचा रस, पालेभाज्या, कोशींबीर, पालेभाज्यांचा सुप, ताक, डाळ, डाळीचे पाणी इत्यादी पदार्थ पोटभरून खावे.
9. जास्त मीठ असलेले पदार्थ लोणच, चटणी, पापड इत्यादी पदार्थ बंद करावे, साखर व मीठाचे प्रमाण अत्यल्प करावे. चहा/दुध/कॉफी मधील अतिरिक्त साखरेने वजन झपाटयाने वाढते.
10. तेल-तुपाचे प्रमाण अत्यल्प करावे. भाज्या तेलामध्ये तळण्यापेक्षा कुक्करमध्ये शिजवाव्यात, उकडून घ्याव्यात.
11. वजन कमी करण्यासाठी आहाराबरोबरच व्यायामाची नितांत आवश्यकता असते. नियमित व्यायामाची सवय ठेवा. चालणे, पळणे, जिम मध्ये जाणे, पोहणे, दोरीच्या उड्या, टेनिस खेळणे या सारखे व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मात्र व्यायामात सातत्य असावे लागते.
12. व्यायाम आहाराबद्दल वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. वयानुसार - वजनानुसार कोणता व्यायाम करावा कोणता व्यायाम फायदेशीर आहे ते समजून घ्या.
13.दर १० ते १५ दिवसानंतर एकाच काटयावर वजन तपासून पहा .