मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लसीचे दोन्ही डोस देण्यात येतायत. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, एकदा लस घेतल्यानंतरही दरवर्षी लस द्यावी लागेल का? कोरोनाचे नवे व्हेरिएंट्स समोर येत असल्यामुळे कोरोना लस किती प्रभावी असेल याबद्दल शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या मनात चिंता आहे.
अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोना प्रतिबंधक लसीपासून मिळणारी प्रतिकारशक्ती ठराविक काळानंतर संपते. याच कारणाने कोविड लसीच्या बूस्टरबद्दल चर्चा चालू आहे. त्याच वेळी, काही लोकांना हे देखील जाणून घ्यायचं आहे की, जर लसीची प्रतिकारशक्ती कालांतराने संपेल, तर त्यांना दरवर्षी कोविडची लस घ्यावी लागेल का?
भारत बायोटेकची कोवॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि रशियाची स्पुतनिक व्ही लस सध्या भारतातील लोकांना दिली जातेय. या सर्व लसी दोन डोसमध्ये दिल्या जातात. कोविडशील्डचा दुसरा डोस 12 आठवड्यांच्या अंतरानंतर घेतला जातो. त्याच वेळी, कोवासीन 4 ते 6 आठवड्यांत देण्यात येतो. एका अहवालानुसार, रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीचे दोन्ही डोस 21 दिवसांच्या अंतराने दिले जाऊ शकतात.
अलीकडे, अशी काही प्रकरणं आहेत ज्यामध्ये लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे तज्ज्ञांमध्ये चिंता वाढली आहे की, लसीद्वारे तयार झालेली प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होते. यानंतर लोकांच्या मनात प्रश्न आहे की बूस्टर डोस नियमितपणे घ्यावे लागतील का?
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा वाढवण्याची गरज असू शकते. एका अहवालानुसार, डॉक्टर म्हणतात की, क्लिनिकल चाचण्या आणि निष्कर्ष पाहता, अशी लस जी केवळ 8 महिने ते एक वर्षापर्यंत अँटीबॉडीज तयार करते अशांसाठी काही महिन्यांनंतर बूस्टर शॉट्सची आवश्यकता असेल.
डॉक्टर म्हणतात की, असे होऊ शकते की काही काळानंतर लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी निर्माण होईल आणि नंतर लसीची गरज भासणार नाही.
तज्ज्ञ असेही म्हणतात की, बूस्टर शेड्यूलवर काहीही बोलणं फार घाईचं ठरेल. कालांतराने आपल्याला लस बूस्टरची आवश्यकता असेल. हे येत्या काळात चिंता आणि संसर्गाच्या विविध नवीन रूपांच्या डेटावर अवलंबून असेल.