मुंबई : अनेकांना किडनीस्टोनचा त्रास होतो. हा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी न पिणं, आहाराचं पथ्यपाणी न सांभाळल्याने किडनीस्टोनचा त्रास बळावतो. काही रूग्णांमध्ये किडनीस्टोनचा त्रास हा वारंवार उद्भवण्याचीही शक्यता असते. म्हणूनच किडनीचं आरोग्य जपायचं असेल तर आहारात सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे.
किडनीस्टोनचा त्रास असणार्यांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मुबलक आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न पिणं हे किडनीस्टोनचा त्रास होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. किडनीस्टोनच्या रूग्णांनी भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अधिक बीया असलेल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावे. यामुळेदेखील किडनीस्टोनचा त्रास वाढू शकतो.
भेंडी, टोमॅटो अशा भाज्यांचा वरचेवर आहारात समावेश करत असाल तर तो टाळा. अशा भाज्यांचा आहारात समावेश करायचा झाल्यास बीया काढून इतर भाग आहारात समाविष्ट करू शकता. भाज्यांप्रमाणेच पेरू, डाळिंबचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. वैद्यांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा.
किडनीस्टोन किंवा मुतखड्याचा आकार लहान असल्यास किंवा सुरूवातीच्या टप्प्यावरच त्याचे निदान झाल्यास काही नैसर्गिक उपायांनीदेखील त्यापासून सुटका मिळू शकते. मात्र 5 मिमी पेक्षा त्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रियेच्या मदतीनेच मुतखडा काढला जातो. किडनीस्टोन कोणत्या जागी आहे यावरही त्याचा त्रास, वेदना अवलंबून असतात. त्यामुळे तज्ञांच्या मदतीनेच उपचारपद्धतीची निवड करणं अधिक सुरक्षित आहे. नक्की वाचा : मूतखड्याचा त्रास दूर करणारे नैसर्गिक उपाय