Low BP चा त्रास आटोक्यात ठेवतील या 5 डाएट टीप्स

उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. 

Updated: May 7, 2018, 07:32 AM IST
Low BP  चा  त्रास आटोक्यात ठेवतील या 5 डाएट टीप्स  title=

मुंबई : उच्च रक्तदाबाच्या त्रासाप्रमाणेच रक्तदाब कमी होणे हे देखील त्रासदायक ठरू शकते. मात्र कमी झालेल्या रक्तदाबाच्या लक्षणांकडे पुरेसे काळजीपूर्वक पाहिले जात नाही. तुम्हांलाही वरचेवर रक्तदाब कमी होण्याचा त्रास असेल तर या डाएट टीप्सने त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. 

ठराविक वेळाने जेवत रहा :

लो बीपीचा त्रास असणार्‍यांमध्ये जेवणानंतर चक्कर येण्याचा त्रास आढळतो. यासाठी एकावेळी भरपेट खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने खाण्याची सवय ठेवा. यामुळे पचनही सुधारते तसेच पोषणद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढते.

कार्बोहायड्रेट्स कमी करा:

बटाटा, पास्ता, भात यामधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्याचा आहारातील समावेश कमी करा. अशा पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते. अनेक अभ्यासांच्या अहवालानुसार postprandial hypotension चा त्रास कमी करण्यासाठी कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थाचे सेवन कमी करणे फायदेशीर आहे. त्याऐवजी डाळी, भाज्या किंवा फळांचा आहारात समावेश करा.

भरपूर पाणी प्या :  

डीहायड्रेशन हे रक्तदाब कमी असल्याचे एक लक्षण आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा.  यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालण्यास मदत होते. 

मीठाचे सेवनावर नियंत्रण ठेवा :

अति मीठ किंवा खारट पदार्थ खाण्याची सवय उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतात. त्यामुळे रक्त दाब कमी असणार्‍यांनीही मीठावर नियंत्रण ठेवावे. दिवसाला 2-3 mg पेक्षा अधिक मीठ खाऊ नये. 

कॅफिनयुक्त पेयांचा वापर प्रमाणात ठेवा :  

चहा, कॉफी यासारखे कॅफीनयुक्त पदार्थ तात्पुरता रक्तदाब वाढवतात. तुम्हांला सतत रक्तदाब कमी होण्याचा त्रास असेल तर सकाळी कपभर ब्लॅक कॉफ़ी प्या. मात्र त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

मद्यपान टाळा :

अल्कोहलच्या सेवनामुळे डीहायड्रेट होण्याचा धोका अधिक असतो. परिणामी रक्तदाब कमी होतो.