कोरोना रुग्णांमध्ये का जाणवतोय रक्ताच्या गुठळीचा धोका ? तज्ञांनी दिलंय उत्तर

जागतिक स्तरावर केलेल्या संशोधनातून हे सिद्ध 

Updated: May 8, 2021, 07:30 AM IST
कोरोना रुग्णांमध्ये का जाणवतोय रक्ताच्या गुठळीचा धोका ? तज्ञांनी दिलंय उत्तर title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus) हा केवळ फुफ्फुसाचा आजार आहे अशी पूर्वीची संकल्पना होती. पण याही पेक्षा भयंकर प्रकार यामध्ये होतोय. कोरोनामध्ये धोकादायक मार्गाने रक्त गोठू शकते, जे तात्काळ काढून टाकणे आवश्यक आहे. तरच अवयव वाचू शकतील, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. जागतिक स्तरावर केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. 

कोविड 19 मध्ये रूग्णालयात दाखल झालेल्या 14 ते 18 टक्के रुग्णांमध्ये रक्ताची गुठळी दिसली. ज्याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT) म्हणतात. त्याचवेळी, दोन ते पाच टक्के रुग्णांमध्ये धमनी थ्रोम्बोसिसचे प्रकरण उद्भवले. हा संसर्ग फुफ्फुसांच्या रक्त पेशींशीही संबंधित असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलचे (Sir Ganga Ram Hospital) अँजिओग्राफी सर्जन डॉ. अंबरीश सात्विक म्हणाले (Ambarish Satwik) की, आम्ही दर आठवड्याला सरासरी पाच ते सहा प्रकरणे अशी पाहतोय. या आठवड्यात दररोज असा प्रकार समोर येतोय.कोविड 19 मधील अशा रुग्णांमध्ये रक्त गोठल्याचा प्रकार समोर आलाय, ज्यांना टाइप -२ मधुमेह आहे. त्यांना इन्सूलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये आणि लघवीमध्ये साखर आढळते आहे. तरीही नेमके कारण अद्याप माहित नाही.'

विशेष म्हणजे, डीव्हीटी ही एक गंभीर स्थिती आहे. ज्यामध्ये शरीराच्या आत मज्जातंतूंमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होतात. धमनी थ्रोम्बोसिस रक्तवाहिन्यांमधील गुठळ्या होण्याशी संबंधित आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कोविड 19 च्या रक्ताच्या गुठळ्या बनण्याच्या नात्यावर लक्ष वेधून डॉ. सात्विक यांनी ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णाच्या एका अवयवाच्या धमनीत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे चित्र पोस्ट केले होते.