मुंबई : दिवसेंदिवस कर्करोगाचा धोका वाढला आहे. बॉलिवूड, क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनाही कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यापैकी काही जणांनी कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली तर काहींना मात्र प्राण गमवावे लागले. कर्करोग हे भारतातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारा एक प्रमुख घटक आहे. त्यामुळे तंबाखू वर्ज्य करण्याचा, व्यायाम करण्याचा, सकस आहार घेण्याचा आणि कर्करोगाची नियमित चाचणी करून घेण्याचा, कुटुंबाची कर्करोगाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याचा आणि वेळेवर लस घेण्याचा सल्ला एसीआय कंम्बाला हिल हॉस्पिटलच्या हेड अँड नेक कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पारीख यांनी दिला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे ११,५७,२९४ रुग्ण नोंदविले जातात सुमारे २२.५ लाख रुग्ण या आजारासह जगत आहेत. त्याचप्रमाणे २०१८ साली कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७,८४,८२१ आहे.
दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. या वाढीला प्रामुख्याने पर्यावरणीय घटक कारणीभूत आहेत. धूम्रपान करणं घातक आहेच, मात्र पॅसिव्ह स्मोकिंगही (इतरांच्या धूम्रपानाचा धूर श्वासावाटे आपल्या शरीरात येणे) जीवघेणं ठरू शकतं. या दोन्ही प्रकारच्या धूम्रपानाचे दुष्परिणाम लगेच नव्हे तर, २० ते २५ वर्षांनंतर जाणवू लागतात. म्हणजेच, कॅन्सरच्या आता वाढलेल्या प्रमाणास १९९० मधील धूम्रपान कारणीभूत असू शकेल, हे लक्षात घ्यायला हवं. महिलांनी साधारण चाळीशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी व पॅप्स स्मीअर या चाचण्या करणं गरजेचं आहे. यामुळे अनुक्रमे ब्रेस्ट व सर्व्हायकल कॅन्सरचा संभाव्य धोका लक्षात येऊ शकतो. या प्रकारच्या कॅन्सरचं योग्यवेळी निदान झालं, तर कॅन्सरला रोखता येतं. आहाराचा विचार केला तर मांसाहारी व्यक्तींनी प्रोसेस्ड मीट बिलकूल खाऊ नये. अशा प्रकारचं मटण हे कॅन्सरला प्रोत्साहन देणारं ठरू शकतं. जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल केल्यास कॅन्सरचा धोका नियंत्रणात ठेवता येतो.
तंबाखू : तंबाखू किंवा धूम्रपानामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो. हा संबंध १९५० मध्येच प्रस्थापित करण्यात आला आहे. आता धूम्रपान करणाऱ्यांमध्ये न करणाऱ्यांच्या दहापटीने कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. जे सिगारेटच्या प्रतिदिनी ओढल्या जाणाऱ्या दरावर अधिकच अवलंबून असते. सिगारेट ओढण्याने घशाचा कर्करोग (आठ पटीत), तोंडाचा व श्वासनलिकेच्या आरंभाचा कर्करोग (चार पटीत) तर मूत्राशय व पॅन्क्रियाजचा कर्करोग दोन पटीने होतो. पाईप (चिलीम) किंवा सिगार ओढणाऱ्यांना तर अधिकच धोका संभवतो. जे सिगारेट ओढत नाहीत, पण सिगारेट ओढणाऱ्याच्या संपर्कात राहतात, अशांना धूर नाकारत गेल्याने कर्करोग होऊ शकतो. सिगारेटमधील टारमुळे ३०% प्रमाणात कर्करोग होतो.
मद्यपान : अतिप्रमाणात मद्यपानामुळे यकृताचा कर्करोग तर होतोच, पण तोंडाचा, घशाचा (अन्ननलिकेचा) ही कर्करोग होतो. दारू पिणारे बहुतांशी प्रमाणात सिगारेट किंवा तंबाखूचे शौकीन असतात, हे अधिक घातक ठरते. मद्यपान व धूम्रपान हे एकमेकांना पूरक असल्याने असे पदार्थ टाळण्यानेच कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.
मसालेदार अतिशय गरम पदार्थांचे सेवन: आपल्याला माहित आहे का.. मसालेदार, अतिशय गरम पदार्थांचे सेवनताने मच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मसालेदार व गरम पदार्थांचे अति प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुसे, तोंड, अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.
एचपीव्ही विषाणू - एचपीव्ही विषाणूमुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो, ही बाब आतापर्यंत सर्वांना ज्ञात होती. आता हे विषाणू घशाच्या कर्करोगासही जबाबदार असतात, हेही अनेक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. ‘एचपीव्ही-१६’ हा त्यातील सहसा आढळणारा विषाणू आहे. तो पुरूष व स्त्रिया या दोघांवरही परिणाम करतो. ज्या व्यक्ती अनेक जणांशी मुखमैथुन करतात, त्यांना ‘ओरोफारिंजिअस’ कर्करोग होण्याचा धोका खूपच जास्त असतो. मुखमैथुनातून ‘एचपीव्ही’चे इन्फेक्शन झाले, तर घशाचा कर्करोग होतो.
स्तनपान न करणे - बाळाला स्तनपान दिल्यास मातेला गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. मातेच्या शरीरात दूध तयार होत असताना हार्मोन्सची गरज असते. त्यामुळे शरीरात अशा कोशिका तयार होत नाहीत ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधनानुसार एक वर्ष स्तनपान देणा-या मातेला कर्करोगाचा धोका ५ टक्क्यांनी कमी होतो.
अतिनील किरणं – जास्त काळ उन्हात फिरल्याने ही सुर्याची हानीकारक अतिनील किरणं त्वचेवर दुष्परिणाम करतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोगाला होऊ शकतो.
व्यायामाचा अभाव: व्यायाम न करणे तसेच मेदयुक्त आहार घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि म्हणूनच अशा लोकांना कर्करोगाचा धोका असतो.