देशात पुन्हा चिंता वाढवणार Corona? केंद्र सरकारचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिलंय आहे.

Updated: Jun 4, 2022, 06:13 AM IST
देशात पुन्हा चिंता वाढवणार Corona? केंद्र सरकारचं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र title=

मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झालंय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी शुक्रवारी पाच राज्यांना पत्र लिहिलंय आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. 

या सर्व राज्यांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. या राज्यांना आरोग्य मंत्रालयाने काळजी घेण्याच्या सूचना दिल्यात. शुक्रवारी देशात 4000 हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळलेत. गुरुवारच्या तुलनेत हे 8.9% अधिक आहे. त्यापैकी 33.9% प्रकरणं एकट्या केरळमध्ये आढळून आली आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील 11 जिल्हे, तामिळनाडूतील 2 जिल्हे, महाराष्ट्रातील 6 जिल्हे, कर्नाटक आणि तेलंगणातील एका जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना कोरोना प्रकरणांची चाचणी तसंच नमुन्यांची जीनोम सीक्वेंसिंग सुरू ठेवण्यास सांगितलंय. याशिवाय, त्यांनी राज्यांना कोविड प्रोटोकॉलची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. 

राज्यालाही केंद्र सरकारचं पत्र

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचं केंद्राने म्हटलंय. 

या जिल्ह्यामंध्ये टेस्टिंग आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात यावा, याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही निर्देश दिले गेले आहेत.