एवढ्या जोरात जांभई दिली की जबडाच अडकला! 21 वर्षीय तरुणीचं तोंडच बंद होईना

Woman Jaw Stuck After Yawning: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत या तरुणीने तिच्याबरोबर घडलेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्याबरोबरही पूर्वी असं घडल्याचं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 14, 2024, 09:44 AM IST
एवढ्या जोरात जांभई दिली की जबडाच अडकला! 21 वर्षीय तरुणीचं तोंडच बंद होईना title=
सोशल मीडियावर तरुणीनेच दिली माहिती

Woman Jaw Stuck After Yawning: आपल्यापैकी जवळपास सर्वचजण दिवसातून अनेकदा जांभई देतात. एखाद्याला जांभई देताना पाहिल्यास आपल्यालाही जांभई येते असं म्हटलं जातं. सामान्यपणे कंटाळा, आळस आला की जांभई दिली जाते. अमेरिकेतील एका महिलेने दिलेली एक जांभई सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या महिलेने एवढ्या जोरात जांभई दिली की तिचा जबडा उघडाच राहिला आहे. या महिलेचा जबडा अडकला असून तिचे तोंड उघडेच राहिले आहे. जेना सेंटारा असं या या तरुणीचं नाव असून ती 21 वर्षांची आहे. 

 वाढदिवसाच्या आधीच घडला हा प्रकार

जेना ही अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहते. तिने व्हिडीओंच्या माध्यमातून तिच्याबरोबर घडलेल्या प्रकाराची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. जेनाने तिच्या पालकांना तिच्या जबड्यामध्ये काहीतरी डिफेक्ट असल्याचं पटवून देण्यात यश आल्याचा दावा व्हिडीओमधून केला आहे. जेनाच्या 21 व्या वाढदिवसाच्या काही दिवसआधीच तिच्याबरोबर हा विचित्र प्रकार घडला. जांभई देताना जेनाने एवढ्या मोठ्याने तोंड उघडं की तिचा जबडाच अडकला. त्यामुळे तिला तोंड बंद करता येत नसल्याचं तिनेच सांगितलं आहे. 

'माझ्याबरोबर हे असलं काहीतरी...'

आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर जेना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाली. त्यावेळेस तिला डॉक्टरांनी तू एवढा जोर लावून जांभई दिली की तुझा जबडा हलला आहे, असं सांगितलं. तिच्या जबड्याची तपासणी करण्यात आली. तोंड उघडं राहिलेल्या जेनाचा तशाच अवस्थेत एक्स रे काढण्यात आला. त्यानंतर तिला मसल रिलॅक्सटंट्स देण्यात आले. म्हणजेच स्थायू पुन्हा सामान्य व्हावेत यासाठीचं विशेष औषध दिल्यानंतर जेनाचं तोंड बंद झालं. या साऱ्यावर प्रतिक्रिया देताना जेनाने, "माझ्याबरोबर हे असलं काहीतरी घडलंय यावर माझाच विश्वास बसत नाहीये," असं म्हटलं.

डॉक्टरांनी केला इलाज

त्यानंतर जेनावर पोलिसांनी उपचार केला. ज्यामध्ये 4 डॉक्टरांनी जांभई देताना तिच्या जबड्यात निर्माण झालेला दोष दूर केला. जेनाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्याला बँण्डएड लावल्याचं दिसत आहे. जेनाबरोबर घडलेला हा सारा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकाने 'आता हा प्रकार पाहून नवीन भिती मनात घर करुन बसली आहे,' अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. "बापरे, हे माझ्याबरोबर घडलं होतं. एकदा जांभई देताना माझा जबडा अडकला होता. मी तो फटके मारुन सरळ केला," असं अन्य एकाने म्हटलं आहे. "माझ्याबरोबर असं घडलेलं पण हे केवळ काही सेंकदांसाठी घडलं. मात्र त्यावेळेस मला अशी भिती वाटत होती की माझे स्नायू वेळीच सामान्य होणार नाहीत," असं म्हटलं. 

मिशिगनमधील डॉ. अँथनी यांनी जेनाबरोबर जे घडलं त्याला 'ओपन लॉक' असं म्हणतात. ज्यामध्ये जांभई देताना स्नायू अडकल्याने तोंड उघडेच राहते.