मुंबई : देशावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत देखील दररोज कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना कोविड संसर्गाचा अधिक धोका असल्याचं समोर आलंय. यानंतर मुंबई महानगरपालिकेने मोठं पाऊल उचललं आहे. लोकांमध्ये किती आणि कोणते असंसर्गजन्य आजार आहेत याची माहिती मुंबई महानगर पालिका घेणार आहे. यासाठी पालिकेकडून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
पुढील आठवड्यात हे सर्व्हेक्षण सुरु केलं जाणार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने हे करण्यात येणार आहे. यामध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, कॅन्सर तसंच स्ट्रोक या आजारांची माहिती घेतली जाणार आहे.
यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना मुंबई महानगर पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा म्हणाल्या, या सर्व्हेक्षणामध्ये एकूण 6000 लोकांची माहिती घेण्यात येणार आहे. तीन टप्प्यांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात येईल. 18 ते 69 वयोगातील लोकांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
डॉ. शहा पुढे म्हणाल्या, "सर्व्हेक्षणाच्या या 3 टप्प्यांमध्ये पहिल्यांदा इंटरव्यू घेण्यात येईल. त्यानंतर नागरिकांचं बीएमआय म्हणडे बॉडी मास इंडेक्स तपासला जाईल. यानंतर तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ब्लड टेस्ट किंवा युरीन टेस्ट करण्यात येईल."
या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून मुंबईकरांमध्ये असंसर्गजन्य आजाराचं प्रमाण किती आहे याची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं यावर उपाय शोधण्यात येईल.