Essential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमी

Essential Medicine: ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jun 15, 2024, 10:54 AM IST
Essential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमी title=

Essential Medicine: आजार आणि त्यावरील औषोधोपचार प्रत्येकालाच परवडतील असं नाही. यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. औषधांवर अनेक पैसे खर्च करणाऱ्या रूग्णांसाठी सरकारने हा निर्णय घेतला असून एकूण 54 गरजेच्या औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

NPPA च्या बैठकीत सरकारने घेतला निर्णय

नुकतंच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी म्हणजेच एनपीपीएची बैठक झाली. एनपीपीएची ही 124 वी बैठक होती. या बैठकीत औषधांच्या किमतीबाबत हा निर्णय घेण्यात आला. एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते. या औषधांचा वापर देशातील सामन्य लोक करतात. बैठकीत 54 औषधी फॉर्म्युलेशन आणि 8 विशेष औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या औषधांच्या किमती घटवल्या

एनपीपीएच्या 124 व्या बैठकीमध्ये 54 औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मधुमेह, हृदय, एंटीबायोटीक्स, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाशी संबंधित औषधे इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त NPPA ने या बैठकीत 8 विशेष वैशिष्ट्यांच्या उत्पादनांच्या किमतींवर निर्णय घेतला.

गेल्या महिन्यात देखील घेतला होता हा 

गेल्या महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या होत्या. गेल्या महिन्यात वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या आणि 6 विशेष औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. यामध्ये अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किमतीही गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या. यकृताची औषधं, गॅस आणि ॲसिडिटीची औषधं, पेन किलर, ॲलर्जीची औषधंही गेल्या महिन्यात स्वस्त करण्यात आली होती.

10 कोटींपेक्षा अधिक लोकांना होतो लाभ

एनपीपीएच्या या निर्णयाचा फायदा देशातील 10 कोटींपेक्षा अधिक लोकांना फायदा होणार आहे. सध्या एकट्या देशात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. हे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना नियमित औषधांवर अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना कमी झालेल्या किमतीचा थेट फायदा होणार आहे.