लंडन : कोरोना व्हायरसबाधित व्यक्ती कोरोनाशी लढणं हीच एक मोठी लढाई असते. मात्र रुग्ण आधीच इतर दुसऱ्या आजारांनी पिडित असल्यास ही लढाई अधिक कठिण ठरते. एका अध्ययनानुसार, रुग्णालयात भरती असलेल्या 10 कोरोना व्हायरस रुग्णांपैकी एक ज्यांना मधुमेह आहे, त्यांची भरती झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्याशिवाय 5 पैकी एका व्यक्तीला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते, असं सांगण्यात आलं आहे.
फ्रान्समधील नानटेस विद्यापीठाच्या संशोधकांनी 10 ते 31 मार्च 2020 दरम्यान 53 फ्रान्सच्या रुग्णालयात भरती असलेल्या 1317 कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांपैकी अधिकांश म्हणजेच जवळपास 90 टक्के रुग्णांना टाईप 2 मधुमेह होता. तर केवळ 3 टक्के रुग्णांना टाईप 3 मधुमेह होता. इतर रुग्णांमध्ये अन्य प्रकारचा मधुमेह असल्याचं, त्यांनी सांगितलं.
Diabetologia जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, मधुमेह असणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी दोन तृतियांश रुग्ण हे पुरुष होते आणि या सर्वाचं वय 70 वर्ष होतं. संशोधकांना या शोधानुसार असं दिसून आलं की, खराब ब्लड शुगर कंट्रोलने कोणत्याही रुग्णांवर थेट परिणाम केला नाही, मात्र मधुमेह आणि वृद्धावस्थेमुळे मृत्यूचा धोका वाढला.
या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, 47 टक्के रुग्णांना डोळे, मूत्रपिंड, नसा यासंबंधी समस्या होत्या. तर 41 टक्के रुग्णांना हृदय, मेंदू आणि पायासंबंधी समस्या होत्या. संशोधकांनी सांगितलं की, 5 पैकी एका रुग्णाला सातव्या दिवसापर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. या दरम्यान 10 पैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर 18 टक्के लोक बरे होऊन घरी गेले होते.
संशोधकांनी सांगितलं की, सातव्या दिवशी, सूक्ष्म रक्तवहिन्यासंबंधी गुंतागुंत झाल्यामुळे मृत्यूचा धोका दुप्पट झाला. त्याशिवाय वाढत्या वयामुळेही मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला. 75 वर्षांच्या अधिक वय असणाऱ्या रुग्णांमध्ये, 55 वर्षाहून कमी वय असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यू होण्याची शक्यता 14 टक्के अधिक असते.
संशोधकांनी या अध्ययनातून सांगितलं की, अनेक काळापासून मधुमेह असणारे, श्वासासंबंधी समस्या असणाऱ्या वृद्धांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असू शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी खास काळजी घेणं आवश्यक ठरु शकतं. मात्र 65 वर्षाहून कमी वय असणारे रुग्ण ज्यांना टाईप 1 मधुमेह आहे, अशा कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. अध्ययनादरम्यान टाईप 1 मधुमेह असणारे केवळ 39 रुग्ण होते आणि अशा रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचंही सांगण्यात आलं आहे.