Vinod Khanna Story: हिंदी कलाजगतामध्ये काही बड्या कलाकारांची नावं घ्यायची झाल्यास त्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव आघाडीवर येतं. त्यांच्या आधीच्या फळीमधील काही नावंही ओघाओघात पुढे येतात. अशाच नावांच्या गर्दीत एक नाव असंही होतं ज्या अभिनेत्यानं अमिताभ बच्चन यांना फक्त अभिनयाच्याच बाबतीत नव्हे, तर कमाईच्या बाबचीतही चांगलीच टक्कर दिली होती. पण, करिअरमध्ये एक उंची गाठल्यानंतर अचानकच या अभिनेत्यानं संन्यासाची वाट निवडली. जीवनातील काही वर्षे एक संन्यस्त व्यक्ती म्हणून गुरुच्या आश्रमात राहणाऱ्या या अभिनेत्यानं दरम्यानच्या काळात कलाजगताकडे पाहिलंही नाही.
दिसायला रुपवान आणि अनेक तरुणींच्या गळ्य़ातील ताईत असणाऱ्य़ा या अभिनेत्यानं 1982 मध्ये जो गुरु निवडला, त्याच्या नावाची त्या काळात बरीच चर्चा होती. या गुरुच्या अवतीभोवती अनेक वादांची वलयंसुद्धा होती. जगाला अध्यात्म शिकवणाऱ्या या गुरुच्या आश्रमात अनेक चुकीच्या गोष्टी घडतात असे आरोपही अनेकांनी केले होते. पण, आपल्याला मानसिक आणि भावनिक शांततेसाठी अध्यात्माची हीच वाट बॉलिवूडच्या या अभिनेत्याला योग्य वाटली आणि ओशो नामक गुरुंच्या आश्रमात अभिनेता विनोद खन्ना यांना स्वामी विनोद भारती अशी नवी ओळख मिळाली.
असं म्हणतात की, 1982 मध्ये विनोद खन्ना यांच्या आईचं निधन झालं. त्याचवेळी त्यांना जीवनात भावनिक पोकळी निर्माण झाल्याचं भासलं आणि त्यांनी अध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांचे अनुयायी होण्याचं ठरवत संन्यास घेतला. असं म्हणतात की पुढे विनोद खन्ना ओशो यांचे शिष्य झाले, तिथं त्यांच्या आश्रमात माळीकामही करु लागले. संन्यस्त मार्गावर असताना त्यांनी कुटुंबापासून दुरावा पत्करला, पत्नीला घटस्फोटही दिला.
काही वर्षे ओशोंच्या आश्रमात अनुयायी म्हणून राहिल्यानंतर अमेरिकेत असणारं ओशोंचं आश्रम बंद झालं आणि विनोद खन्ना यांनी पुन्हा भारत गाठला. मुंबीत परतल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये ‘इन्साफ’ चित्रपटातून चित्रपट वर्तुळात पुन्हा पाऊल ठेवला. विनोद खन्ना यांचं खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरलं. कलाजगतात मोठ्या अभिनेत्यांशी स्पर्धा, त्यात त्यांनी मारलेली बाजी, विनोद खन्ना यांचं संन्यस्त मार्गावर जाणं, ओशोंच्या आश्रमात संपूर्णत: झोकून देणं या सर्व गोष्टी पाहणाऱ्यांना अवाक् करत होत्या. अशा या अभिनेत्यानं 2017 मध्ये जगाचा निरोप घेतला.