Vivek Oberoi : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांकानं त्यांच्याच तीन बिझनेसपार्टनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. विवेक ओबेरॉयनं 2017 साली एक प्रोडक्शन हाऊस सुरु केलं होतं. त्यात त्याचे काही बिझनेसपार्टनर होते. त्यांच्या विरोधात विवेकनं 1.55 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. यावेळी तक्रार करत विवेकनं सांगितलं की आरोपींनी त्याला एका प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले आणि त्यातून खूप नफा होईल याचे आश्वासन देखील दिले. मात्र, त्यानंतर आरोपींनी त्या पैशाचा त्यांच्या स्वार्थसाठी गैरवापर केला.
विवेक ओबेरॉयच्या या कंपनीचे नाव आनंदीता एन्टरटेनमेंट एलएलपी असे होते. त्या प्रकरणी विवेकनं अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतली आहे. विवेकनं बुधवारी हा गुन्हा दाखल केला आहे. तर निर्माता संजय सहा यांच्यासह नंदिता सहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 24 फेब्रुवारी 2017 रोजी ओबेरॉय ऑर्गनिक एलएलपीची स्थापना करण्यात आली होती. विवेक आणि त्यांची पत्नी प्रियंका या कंपनीचे भागीदार आहेत.
“ओबेरॉयने 2017 मध्ये ओबेरॉय ऑरगॅनिक्स नावाची कंपनी सुरू केली होती. ती फारशी चांगली चालत नसल्यामुळे, त्यानं तीन लोकांना भागीदार बनवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर तो बिझनेस सोडून आनंदिता एंटरटेनमेंटच्या नावाखाली इव्हेंट मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला, असे अकाउंटंट देवेन बाफना यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हा करार दोन्ही पक्षांमध्ये जुलै 2020 मध्ये झाला होता.
फेब्रुवारी 2021 मध्ये, शाह आणि ओबेरॉय यांनी Ganshe चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीला त्यासाठी साइन केले आणि ओबेरॉयने त्यासाठी 51 लाख रुपये दिले. दिग्दर्शक आणि लेखक यांनाही मोबदला दिला गेला. ओबेरॉय आणि संजय चित्रपटाच्या प्रसारणासाठी एका OTT प्लॅटफॉर्मवर चर्चा करत होते, असे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : 'तुम्हारा कोई हक नाही मुझपे', टोमॅटोचा भाव पाहून वाढली शिल्पा शेट्टीची 'धडकन'; शेअर केला मजेशीर व्हिडीओ
तर 2022 च्या सुरुवातीला त्याची गुंतवणुक पाहता, विवेकच्या लक्षात आले की संजय त्या सगळ्या गुंतवणूकीचा गैरवापर करत आहे. जेव्हा विवेक कंपनीच्या मॅनेजरशी बोलला तेव्हा त्याच्या लक्षात आले की संजय, नंदिता आणि राधिका यांनी कंपनीच्या 58.56 लाख रुपयांच्या निधीचा वापर हा विमा भरणे, दागिने खरेदी करणे, पगार काढणे इत्यादी वैयक्तिक खर्चासाठी गैरवापर केला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.