मुंबई : 'शेरनी' सिनेमाच्या सेटवर अभिनेता विजय राज यांच्यावर छेडछाडीचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे प्रमुख भूमिकेत असलेल्या विजय राज यांचे सिनेमातील काम थांबवण्यात आले आहे. आरोपानंतर पहिल्यांदा विजय राज यांनी मौन सोडले आहे.
या प्रकरणी लोकांनी दुसरी बाजू समजून घेणेही गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणतीही एकच बाजू जाणून मते बनवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. या आरोपांमुळे आपल्यासह कुटुंबीयांना मनस्ताप हन करावा लागला असून आपले एवढ्या वर्षांचे करिअर धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांपर्यंत दुसरी बाजू पोहचत नसल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली.
आरोपानंतर विजय राज यांना सिनेमातून काढून टाकलं असून आता त्या जागी नव्या कलाकाराचा शोध घेतला जात आहे. या सिनेमाचं पुन्हा नव्याने चित्रिकरण होणार आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात 'शेरनी' सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत होती.
या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानच गोंदिया पोलिसांकडून अभिनेता विजय राज यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यावर राज मुंबईत परतले. या घटनेनंतर चित्रपटातील आपले काम थांबवण्यात आल्याचा ईमेल आल्याचे राज यांनी सांगितले. या आरोपांच्या चौकशीसाठी समिती (आयसीसी) स्थापन करण्यात आली आहे.
आपल्याला 21 वर्षांची मुलगी असल्याने या प्रकरणातील गांभीर्याची आपल्याला जाण आहे. या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे राज यांनी सांगितले. मात्र, चौकशीपूर्वीच आपले काम थांबवण्यात आल्याने धक्का बसल्याचे राज यांनी सांगितले. याबाबतच्या भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे ते म्हणाले. 23 वर्षांपासून आपण या क्षेत्रात काम करत आहोत. आपण खूप मेहनतीने कारकिर्द घडवली आहे.