मुंबई : टेलिव्हिजन, चित्रपट विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा असणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्री आणि डान्सरला अशा परिस्थितीचा वारंवार सामना करावा लागत आहे, ज्यामुळं अखेर नाईलाजानं त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच मदत मागितली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपली आर्त हाक ऐकावी याच उद्देशानं या अभिनेत्रीनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
एका अवहेलनाजनक प्रसंगाचा सामना करावा लागणाऱ्या या अभिनेत्री आहेत, सुधा चंद्रन. कामानिमित्ततानं त्या जेव्हा जेव्हा विमान प्रवास करतात तेव्हा तेव्हा CISF कडून त्यांना थांबवण्यात येतं. मुळात त्यांना का थांबवण्यात येतं हे कारण अनेकांनाच न पटण्याजोगं आहे.
काय म्हणाल्या सुधा चंद्रन?
एका रस्ते अपघातामध्ये सुधा चंद्रन यांना पाय गमवावा लागला होता. ज्यानंतर त्यांना कृत्रिम पायाचा आधार घ्यावा लागला होता. असं असतानाही त्यांनी कारकिर्दीत कुठेही न थांबता आपला प्रवास सुरुच ठेवला. पण, वेळोवेळी त्यांना विमानतळावर जी वागणूक दिली गेली, ते पाहता त्यांना अखेर हा व्हिडीओ पोस्ट करावा लागला.
व्हिडीओ शेअर करत त्या म्हणाल्या, 'मी पंतप्रधानंना एक कळकळीची विनंती करु इच्छिते. मी एक अभिनेत्री आणि डान्सर आहे. कृत्रिम पायाच्या आधारे नृत्य करत मी इतिहास रचला आहे. देशाचं नाव मोठं केलं आहे. पण, मी जेव्हाजेव्हा कामानिमित्त कुठे जाते, त्यावेळी मला विमानतळावर थांबवण्यात येतं. प्रत्येक वेळी सीआयएसएफ अधिकाऱ्यांना विनवणी करते की कृत्रिम पायासाठी माझी ईटीडी टेस्ट करा. पण, मला वारंवार कृत्रिम पाय काढण्यास सांगितला जातो. हे कितपत योग्य आहे मोदी जी? आपण यासंद्भात बोलू शकतो का? अशाच पद्धतीनं एक महिला दुसऱ्या महिलेला आदर देते?'
आपल्याला होत असणारा त्रास वारंवार अनेक अडचणी उभ्या करत असल्यामुळे सुधा चंद्रन यांनी मदतीसाठी पंतप्रधानांकडे धाव घेतली आहे. आता त्यांच्या मागणीवर केंद्रातून काही निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.