Urfi Javed : अतरंगी कपड्यांमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी वायर, कधी सुतळ तर कधी कपड्यांना कातरी लावत अतरंगी ड्रेस बनवणारी उर्फी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने आता दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरविरोधात नाराजी व्यक्त केली. तिने सोशल मीडियावर दिल्लीतील हा अनुभव शेअर केला.
उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अतरंगी कपड्यांमधील व्हिडीओबरोबरच ती समाजातील घडामोडींवरही भाष्य करताना दिसते. ट्वीटर व इन्स्टाग्रामवरुन उर्फी व्यक्त होत असते. मात्र आता ती दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरमुळे सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसून आली आहे.
Had the worst experience with @UberINSupport @Uber in delhi,booked a cab for 6 hours,on my way to airport stopped to have lunch, the driver vanished with my luggage in the car. After interference from my male friend the driver came back completely drunk after 1 hour @Uber_India pic.twitter.com/KhaT05rsMQ
— Uorfi (@uorfi_) February 21, 2023
उर्फी जावेदने (Urfi Javed) दिल्लीत सहा तासाच्या प्रवासासाठी उबेर कॅब बुक केली. विमानतळावरच्या वाटेवर ती जेवणासाठी थांबली. तेव्हा ड्रायव्हर तिचं सामान घेऊन पळून गेला. त्यानंतर तिचा एक मित्र तिच्या मदतीला धावून आला. तिच्या मित्राने त्या उबेर ड्रायव्हरला सतत फोन केले. त्यानंतर तो ड्रायव्हर तासाभरानंतर उर्फीला भेटला, पण तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता.
या घटनेबाबत उर्फीने ट्विटरवर कॅब बुक केल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट करत तिच्यासोबत घडलेला प्रकार शेअर केला. उर्फीने उबर कंपनीला ट्विटरवर टॅग करत म्हटले की, 'त्या व्यक्तीला धड चालताही येत नव्हते. आधी तो त्याची गाडी कुठे आहे याबाबत खोटं बोलत राहिला, की तो पार्किंगमध्ये आहे पण त्याचे लोकेशन आमच्यापासून 1 तास अंतरावर दाखवत होते. माझ्या एका मित्राला मला फोन करावा लागला, कारण तो ड्रायव्हर इतके कॉल करूनसुद्धा त्याच्या जागेवरुन हलतही नव्हता.'
याशिवाय उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत म्हणाली, 'उबर कृपया काहीतरी करा. हे महिलांच्या सुरक्षिततेच्या विरोधात आहे. मला खूप वाईट अनुभव आला आहे. आधी ड्रायव्हरने माझे सामान घेतले आणि नंतर दोन तासांनी मद्यधुंद अवस्थेत परतला.' उर्फीच्या ट्विटनंतर कंपनीचे उत्तरही आले आणि त्याने उर्फीची माफी मागितली.