अभिनेता मन्सूर अली खानने अखेर आपल्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली आहे. मन्सूर अली खानने लिओ चित्रपटातील सह-अभिनेत्री त्रिशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ माजली होती. दिग्दर्शक लोकेश कांगाराज, चिरंजीवी यासह अनेकांनी यावर संताप व्यक्त केला होता. पण इतक्या वादानंतरही मन्सूर अली खानने माफी मागण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर आपल्यावर बंदी घालणाऱ्या नादीगर संगम या चित्रपट संघटनेला अल्टिमेटम दिला होता. पण चेन्नई पोलिसांनी समन्स बजावल्याने नरमाईची भूमिका घेत त्याने माफी मागितली आहे. महिला आयोगाने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
मन्सूर अली खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्रिशाची माफी मागितली आहे. आपण केलेल्या अपमानजनक विधानाबद्दल माफ करा असं ते म्हणाले आहेत. दरम्यान मन्सूर अली खानने माफी मागितल्यानंतर त्रिशाही त्यावर व्यक्त झाली आहे. "चूक करणे मानवी आहे, क्षमा करणे दैवी आहे", असं ती म्हणाली आहे. यावेळी तिने कोणाचाही उल्लेख केलेला नाही. दरम्यान सोबत हात जोडलेली इमोजी वापरली आहे.
To err is human,to forgive is divine
— Trish (@trishtrashers) November 24, 2023
मन्सूर अली खानने पत्रकार परिषदेते म्हटलं होतं की, "मी लिओ चित्रपटाचा भाग असतानाही त्रिशासह माझे काही सीन नाहीत. त्रिशासह बेडरुम सीन करण्याची माझी संधी हुकली". या विधानाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता.
या वक्तव्यानंतर नादीगर संगम या चित्रपट संघटनेने मन्सूर अली खानवर तात्पुरती बंदी घातली होती. यानंतर 21 नोव्हेंबरला मन्सूर अली खानने पत्रकार परिषद घेतली. जोपर्यंत चूक लक्षात येत नाही आणि माफी मागत नाही तोवर बंदी मागे घेणार नाही हे संघटनेने स्पष्ट केलं होतं.
"अलीकडेच एक व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे ज्यामध्ये मन्सूर अली खान यांनी माझ्याबद्दल नीच आणि घृणास्पद रीतीने बोललं आहे. मी याचा तीव्र निषेध करते. हे लैंगिक, अनादरपूर्ण, गैरवर्तनवादी, तिरस्करणीय आहे. तो इच्छा ठेवू शकतो पण त्याच्यासारख्या घाणेरड्या व्यक्तीसोबत स्क्रीन स्पेस शेअर न केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या उर्वरित चित्रपट कारकिर्दीतही असं कधीही होणार नाही याची मी खात्री करेन. त्याच्यासारखे लोक माणूस जातीला बदनाम करतात", असा संताप तिने पोस्टमधून व्यक्त केला होता.
मन्सूर अली खानने पत्रकार परिषदेत म्हटलं की, "नादीगर संगमने माझ्यावर बंदी घालून मोठी चूक केली आहे. जेव्हा अशी एखादी गोष्ट होते तेव्हा त्यांनी मला साधं स्पष्टीकरणही मागितलं नाही. त्यांनी मला फोन करुन किंवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागायला हवं होतं. यासंबंधी चौकशी व्हायला हवी. पण तसं झालं नाही".
"माझ्याविरोधात त्यांनी केलेली विधानं मागे घेण्यासाठी मी त्यांना 4 तासांचा वेळ देत आहे. मी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं आहे. मी माफी मागणाऱ्यातला वाटतो का? मीडिया माझ्याविरोधात जे हवं ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहिती आहे. मला लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे," असं पुढे त्याने म्हटलं होतं.
पुढे त्याने म्हटलं होतं की, "मीडियाने माझं वक्तव्य छापताना त्रिशा आणि माझा आजुबाजूला फोटो लावला आहे. आम्ही त्यात नवरा-बायकोप्रमाणे दिसत आहोत. तुम्ही माझा चांगला फोटो वापरु शकत नव्हता का? काही फोटोत मी चांगला दिसत आहे".
तसंच आपल्या विधानावर ठाम राहत त्याने म्हटलं की, "चित्रपटातील रेप सीन म्हणजे नेमकं काय असतं? याचा अर्थ खरंच बलात्कार करणं होतो का? सिनेमात हत्येचा सीन असतो तेव्हा खरंच हत्या होते का? काहीतरी अक्कल वापरली पाहिजे. मी काहीच चुकीचं बोललो नसल्याने माफी मागणार नाही".