मुंबई : अभिनेता रणवीर सिंग याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर बऱ्याच काळाने दीपिका पुन्हा चित्रपटांकडे वळली. लग्नानंतरच्या दिवसांमध्ये तिने काही महत्त्वाच्या चित्रपटांच्या प्रस्तावांनी स्वीकृती दिली. त्यातीलच एक नाव म्हणजे 'छपाक'. ऍसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवाल हीच्या आयुष्यातील काही प्रसंगांचा आधार घेत 'छपाक'चं कथानक साकारण्यात आलं आहे.
साधारण या वर्षाच्या सुरुवातीलाच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. ऍसिड हल्ला पीडितेप्रमाणे चेहरा दाखवण्यासाठी तशाच पद्धतीचा मेकअप दीपिकाला करण्यात आला. यामध्ये प्रोस्थेटीकचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. या चित्रपटातील दीपिकाच्या लूकने फक्त चाहत्यांनाच धक्का बसला नाही, तर या भूमिकेने दीपिकावरही काही परिणाम झाले.
एका मुलाखतीत दीपिकाने याबाबचा खुलासा केला. कोणत्या भूमिकेचा तुझ्यावर सर्वाधिक परिणाम झाला? असा प्रश्न विचारला असता 'छपाक'चं नाव तिने लगेचच पुढे केलं. 'चित्रपटाच्या शेवटच्या दिवशी मी वापरलेले प्रोस्थेटीकचे तुकडे मी अक्षरश: जाळले होते. मी कधीही अपेक्षाच केली नव्हती इतक्या पटींनी त्या भूमिकेमुळे झालेल्या काही प्रसंगांचा मला अनुभव आला होता. त्यामुळे सारंकाही मागे सोडण्याचा माझा प्रयत्न होता', असं दीपिका म्हणाली.
प्रोस्थेटीकचा प्रत्येक तुकडा हा अतिशय महाग असतो, किंबहुना त्यासाठी तितकेच पैसेही मोजलेले असतात, असं सांगत दीपिकाने आपण ते जाळण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. 'मला काहीही फरक पडत नाही, पण मला भावनिकदृष्ट्या या गोष्टीत अकडायचं नाही', अशीच आपली भूमिका असल्याचं दीपिका म्हणाली.
प्रोस्थेटीकचा एक तुकडा बनवण्यासाठी जवळपास २-३ दिवसांचा कालावधी लागतो, अशी माहिती देत चित्रीकरणाच्या अखेरच्या दिवशी आपण तेच तुकडे जाळल्याचं दीपिकाने सांगितलं. 'आपल्याला जास्तीचा तुकडा हवा आहे, असं मी मेकअप आर्टीस्टला सांगितलं. तिनेही तसं तयार करत मला दिलं. मला आठवतंय की तो तुकडा घेऊन त्यावर मद्य (दारु) टाकत एका कोपऱ्या तो मी जाळला. तो जळून पूर्ण खाक होईपर्यंत मी त्याच्याकडेच पाहात होते', असं दीपिका म्हणाली.
'छपाक' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचा पूर्ण अंश माझ्यातून गेला असं नाही. पण, तो तुकडा जळतानाचे क्षण मात्र माझ्या मनात राहिले आहेत हेसुद्धा तिने स्पष्ट केलं. या चित्रपटाने आपल्यावर इतर कोणत्याही चित्रपटापेक्षाही जास्त प्रमाणत परिणाम घडवून आणले आहेत, असा खुलासा दीपिकाने केला. अतिशय मेहनतीने एका वास्तवदर्शी कथेचा मागोवा घेत करण्यात आलेले दीपिका आणि तिच्या टीमचे प्रयत्न २०२० च्या जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.