सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण रियाने पोलिसांना काय सांगितलं?

मुंबई पोलिसांनी गुरुवारी सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिची तब्बल ११ तास चौकशी केली. 

Updated: Jun 19, 2020, 09:32 PM IST
सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण रियाने पोलिसांना काय सांगितलं? title=

राकेश त्रिवेदी, मुंबई:  अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिच्यासह १३ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलीस लवकरच काही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचेही जबाब घेऊ शकतात. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत रियाने सुशांत बरोबर असलेले तिचे संबंध आणि अलिकडेच झालेले वाद याबद्दल माहिती दिली.

मुंबई पोलिसांनी गुरुवारी सुशांतची जवळची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिची तब्बल ११ तास चौकशी केली. या चौकशीत रियाने सुशांतबद्दल माहिती दिली. तिचं त्याच्याशी असलेलं नातं, अलिकडच्या काळात दोघांमध्ये झालेले वाद आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना केलेले मेसेज याबाबत सगळी माहिती रियाने पोलिसांना दिली.

रियाने पोलिसांना सांगितले की, बऱ्याच काळापासून ती सुशांतबरोबर राहत होती आणि नोव्हेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार होते. पण सुशांत आत्महत्या करण्याच्या आधी काही दिवसांपूर्वीच ती सुशांतचं घर सोडून निघून गेली होती.

दरम्यान, बांद्र्यात सुशांत-रियासाठी भाड्याने घराचा व्यवहार करणाऱ्या प्रॉपर्टी एजंटनेही ते दोघे लग्न करणार होते अशी माहिती झी मीडियाला दिली. प्रॉपर्टी एजंट सनी सिंह यांनी झी मीडियाला सांगितले की, मी रियाला २०१०-११ पासून ओळखतो. माऊंट ब्लांक या इमारतीतील तो राहत असलेला फ्लॅट सीडेतीन बीएचकेचा होता आणि सुमारे ३६०० चौरस फुटांचा होता. त्याचे भाडे महिना साडेचार लाख रुपये इतके होते. फ्लॅटचा शोध सुरु असताना तिने मला सांगितले होते की ती सुशांतबरोबर एकत्र राहण्यासाठी भाड्याचं घर शोधत आहेत. लवकरच ते दोघांचा लग्न करण्याचा विचार आहे असेही तिने सांगितले होते.