सुशांतसोबत यशराज फिल्म्सने केलेला तो करार पोलिसांनी मागितला

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

Updated: Jun 19, 2020, 09:18 PM IST
सुशांतसोबत यशराज फिल्म्सने केलेला तो करार पोलिसांनी मागितला title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी वांद्र्यातल्या त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर आता पोलीस सुशांतच्या आत्महत्येचं कारण तपासत आहेत. याचाच भाग म्हणून पोलिसांनी यशराज फिल्म्सकडून सुशांतसोबत केलेल्या दोन चित्रपटांचे करार मागितले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सुशांतच्या आत्महत्येच्या संभाव्य कारणांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी यशराज फिल्म्सला एक पत्र पाठवलं आहे. 

पोलिसांनी सुशांतचे मित्र, सहयोगी, कर्मचारी आणि इतर संबंधित लोकांची चौकशी केली. यानंतर इतर प्रोडक्शन हाऊसचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पोलीस याप्रकरणाची चौकशी करतील, असं सांगितलं होतं. 

सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचीही गुरुवारी पोलिसांनी चौकशी केली. सुशांतने यशराज फिल्म्ससोबतचा त्याचा करार संपवला होता, तसंच आपल्यालाही त्याने यशराजसोबतचा करार संपवायला सांगितलं होतं, असं रियाने तपासात सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस व्यावसायिक शत्रुत्वाच्या दृष्टीनेही तपास करत असल्याचं पोलीस म्हणाले. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी सुशांतचे नातेवाईक, रिया चक्रवर्ती, सुशांतचे जवळचे मित्र, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा यांच्यासह १३ जणांची चौकशी केली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी मोठ्या प्रोडक्शन हाऊसची संपर्क साधायला सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून पोलिसांनी यशराज फिल्म्सला सुशांतसोबत केलेल्या कराराची प्रत मागितली आहे. येत्या काही दिवसात पोलीस प्रोडक्शन हाऊससोबत सुशांतचा करार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्यांनाही चौकशीसाठी बोलवू शकते. 

सुशांतने यशराज फिल्मसोबत दोन चित्रपट केले होते. यामध्ये २०१३ साली आलेला मनिष शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला शुद्ध देसी रोमांस आणि २०१५ साली दिबाकर बॅनर्जींन दिग्दर्शित केलेल्या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्ससोबत सुशांतचा पानी हा चित्रपटही येणार होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कपूर करणार होते, पण यशराज फिल्म्सने या चित्रपटाला थांबवलं असल्याची चर्चाही सुरू होती.