नवी दिल्ली : दुबईतील हॉटेलमध्ये झालेल्या अभिनेत्री श्री देवींच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीये. श्रीदेवी यांच्या रहस्यमयी मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी अशी याचिका फिल्ममेकर सुनील सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या वर्षी फ्रेब्रुवारीत श्रीदेवींचा दुबईतील हॉटेलमध्ये मृत्यू झाला.हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. ५४ वर्षी अभिनेत्री श्री देवींच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलीवूड विश्वाला धक्का बसला होता. त्यांच्या अचानक मृत्यूने अनेक सवाल उपस्थित होत होते. मात्र तपासाअंती त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्याचे निष्पन्न झाले.
श्रीदेवी त्यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी दुबईत गेली होती. मीडिया रिपोर्ट्स नुसार सुप्रीम कोर्टात श्रीदेवींच्या मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी याचिका करण्यात आली होती. याचिकेत म्हटलं होतं, ज्या परिस्थितीत श्री देवींचा मृत्यू झालाय त्याची चौकशी झाली पाहिजे.
शुक्रवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती एए खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सुनील सिंह यांची याचिका फेटाळून लावली. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही श्री देवींच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका ९ मार्चला फेटाळून लावली होती.