1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये मोठे बदल पाहायला मिळत होते. आमीर, सलमान, शाहरुख असे नावे चेहरे अमिताभ बच्चन, विनोद खन्ना यांची जागा घेऊ लागले होते. यासह अनेक नवे चेहरे रोज बॉलीवूडमधे येत होते. यातील काही हिट झाले तर काही मात्र एकाच चित्रपटानंतर फ्लॉप झाले. यातील एक चेहरा होता सुनील शेट्टी. ऍक्शन हिरो अशी ओळख मिळवत बॉलिवूडमधे दाखल झालेला सुनील शेट्टी आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करतो. दरम्यान सुनील शेट्टीच्या यशात त्याच्या वडिलांचाही मोठा वाटा आहे.
सुनील शेट्टीने नुकतेच एका मुलाखतीत वडिलांनी केलेल्या संघर्षाचा उलगडा केला होता. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर सुनील शेट्टीने हजेरी लावली होती. यावेळी त्याने आपल्या वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी घरातून पळ काढला होता असा खुलासा केला. तसंच घरातून पळाल्यानंतर त्यानी मुंबई गाठली होती आणि वेटरचं काम केलं होतं असही त्याने सांगितले. विशेष म्हणजे वेटर म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले होते. इतकेच नाही तर त्यांनी जिथे काम केलं त्या तीन इमारतीही विकत घेतल्या.
वडिलांचा संघर्ष उलगडताना सुनील शेट्टीने सांगितले की "माझे वडील बालपणी घरातून पळून मुंबईत आले होते. त्यांना वडील नव्हते, पण तीन बहिणी होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना एका साऊथ इंडियन रेस्तराँमध्ये काम मिळालं. आमच्या समाजात आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो".
पुढे त्याने सांगितले की, त्यांना सर्वात आधी टेबल पुसण्याचं काम मिळालं होतं. ते फार लहान होते. यामुळे टेबल पुसताना त्यांना चारही बाजूला फिरायला लागायचं. ते तांदळाच्या पोत्यावर झोपायचे.
“त्यांच्या बॉसने तीन इमारती विकत घेतल्या आणि वडिलांना त्या सांभाळण्यास सांगितलं. बॉस निवृत्त झाल्यावर वडिलांनी तिन्ही इमारती विकत घेतल्या. आजही माझ्याकडे तिन्ही इमारती आहेत. आणि तिथूनच आमचा प्रवास सुरू झाला,” असाही खुलासा सुनील शेट्टीने केला.