श्रीदेवींच्या साडीचा लिलाव सुरूच; लाखांच्या वर बोली

लिलावात मिळणारी रक्कम सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे. 

Updated: Feb 24, 2019, 11:54 AM IST
श्रीदेवींच्या साडीचा लिलाव सुरूच; लाखांच्या वर बोली  title=

मुंबई : दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांच्या आवडत्या साड्यांपैकी हातने विणलेली एक  कोटा साडी लिलावासाठी ठेवण्यात आली आहे. लिलावातून आलेली रक्कम एका सामाजिक संस्थेला दान म्हणून देण्यात येणार आहे. श्रीदेवी यांच्या पहिल्या पुण्यतिथी आधीच साडी लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.

चेन्नईतील ऑनलाईन मंच 'पेरिसेरा'नुसार, कपूर कुटुंबियांनी लिलावातून मिळालेली रक्कम एका धर्मार्थ ट्रस्ट कंसर्न इंडिया फाउंडेशनला दान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे फाउंडेशन महिला, वृद्ध, दिव्यांग आणि मुलांसाठी शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या सामुदायिक विकासासाठी काम करते. 

'पेरिसेरा' भारतीय हस्तशिल्पामधील विशेषज्ञ आणि 'बीइंग जनेरस, विथ श्रीदेवी' यांच्याकडून ऑनलाईन लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजार रूपयांपासून या साडीच्या लिलावासाठी सुरूवात झाली होती. हा लिलाव अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत लिलावाची बोली १,३०,००० रूपयांपर्यंत पोहचली आहे. 'पेरिसेरा'ने साडीच्या बोलीसाठी २० फेब्रुवारीला ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. 

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीचे दुबईतील एका हॉटेलमधील बाथ टबमध्ये बुडून निधन झाले. श्रीदेवी यांनी वयाच्या ५४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कला आणि सिनेसृष्टीत त्यांनी दिलेल्या महान योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते. श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ साली झाला होता. श्रीदेवीने तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. भारतीय सिनेमातील 'पहिली महिला सुपरस्टार' ठरलेल्या श्रीदेवी यांना ५ फिल्मफेयर पुरस्कार मिळाले आहेत. १९८० ते १९९०च्या दशकात श्रीदेवी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली होती.