जिंकलात तर 'ही' आश्वासनं पूर्ण करा; रजनीकांत यांचा भाजपला सांगावा

भाजपच्या जाहीरनाम्याविषयी लक्षवेधी वक्तव्य 

Updated: Apr 9, 2019, 07:19 PM IST
जिंकलात तर 'ही' आश्वासनं पूर्ण करा; रजनीकांत यांचा भाजपला सांगावा  title=
रजनीकांत

चेन्नई : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील प्रत्येकाने स्वत:च्या ठाम भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांतही मागे राहिलेले नाहीत. तामिळनाडू निवडणुकांना अवघे दहा शिल्लक असतानाच रजनीकांत यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी संवाद साधत आपलं मत मांडलं. त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्याविषयी लक्षवेधी वक्तव्य केलं. 

भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या जाहीरनाम्याविषयी सांगत रजनीकांत म्हणाले, 'जाहीरनाम्यात भाजपने देशातील नद्या जोडण्याविषयी लिहिलं आहे. ज्यासाठी ते एक समितीही नेमणार आहेत'. भाजपचा हा निर्णय ही एक स्वागतार्ह बाब असल्याचं म्हणत देवाच्या कृपेने आणि मतदारांच्या पाठिंब्याने भाजप सरकार पुन्हा निवडून आलं, तर त्यांनी दिलेल्या आश्वासनांनुसार देशातील सर्व नद्या प्रथमत: जोडाव्यात, असा आग्रही सूर धरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आपण नद्या जोडणी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिल्याचं म्हणत, त्यांनी काही आठवणीही जागवल्या. 

नद्यांच्या जोडणी करण्याचं एक आश्वासन पूर्ण केल्यास देशातील अर्धी गरिबी कमी होईल, करोडो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांचं आयुष्यही सुधारेल अशा आशा व्यक्त करत रजनी यांनी सरकारकडे ही विनंती केली. आगामी लोकसभा निवडणूकांविषयी वक्तव्य करतेवेळी निवडणूक न लढण्याची आपल्या पक्षाची भूमिका ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. २०२१ मध्ये तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरच त्यांच्या पक्षाचं लक्ष्य असणार आहे. कलाकार मित्र आणि राजकारणातील प्रतिस्पर्धी कमल हसन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाला पाठिंबा देण्याविषयीचा प्रश्न विचारताच त्यांनी या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार देत आमच्यातील मैत्रीचं नातं वाईट करु नका अशी विनंती केली. 

'थलैवा' यंदाच्या निवडणूकांच्या रिंगणात उतरणार नसले तरीही, त्यांनी भाजपच्या जाहिरनाम्याविषयी केलेलं वक्तव्य आणि एकंदरच त्यांची भूमिका पाहता मतदारांवर त्यांच्या या वक्तव्यांचा कितपत परिणाम होतो आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, हे पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.